तीन वर्षांपूर्वी पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे जमिनीखाली गाडल्या गेलेल्या माळीणचे राज्य सरकारने पुनर्वसन केले. मात्र पहिल्याच पावसात माळीणची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. माळीणमधील रस्ते, शाळा आणि घरांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात माळीणमध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावात भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने अवघा महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. या घटनेनंतर माळीणचे पुनर्वसन करण्‍याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. त्याच डोंगराच्या पायथ्याशी माळीण गाव नव्याने वसवण्यात आले. शाळा, घरांची नव्याने बांधणी करण्यात आली. महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन माळीण गावाचे उद्घाटनही करण्‍यात आले. मात्र पहिल्याच पावसात रस्ते, शाळा आणि घरांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे माळीणमधील कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुन्हा भूस्खलन झाल्यास काय होईल, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

malin-4

विशेष म्हणजे दुर्घटनेच्‍या दोन वर्षांनंतर सरकारने मोठा गाजावाजा करत स्मार्ट व्हिलेज म्हणून माळीण गावाचे उद्घाटन केले. मात्र उद्घाटनानंतर महीनाभरातच नवीन माळीणची बिकट अवस्था झाल्‍याचे चित्र समोर आले आहे. यामुळे माळीणवासियांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.

malin-5