शहरातील डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अखेरचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने ‘मिशन डेंग्यू’ हाती घेतले आहे. डेंग्यूच्या डासाला हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले असून महापालिकेचे २ हजार २८० कर्मचारी दहा लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून र्निजतुकीकरण करणार आहेत. शुक्रवारपासून (३१ ऑक्टोबर) पाच दिवस हे अभियान चालणार आहे.
जून महिन्यापासून शहरात दररोज डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने पत्रके वाटून जनजागृती केली. सार्वजनिक इमारतींचे परिसर स्वच्छ केले असले, तरीही शहरातील डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण आणण्यात महापालिकेला सातत्याने अपयश आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, क्षेत्रीय कार्यालय, घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मिशन डेंग्यूचे नियोजन करण्यात आले.
डेंग्यूचे डास नष्ट करण्यासाठी ७६ प्रभागांमध्ये पुढील पाच दिवसांत प्रती विभाग ३० कर्मचारी याप्रमाणे २ हजार २८० कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज दीडशे घरांचे उद्दिष्ट दिले असून दहा लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे कर्मचारी त्यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल सादर करणार आहेत. औषध फवारणीसाठी महापालिकेकडे असलेली १९० मशिन्स कमी पडत असल्याने आणखी २०० मशिन्स भाडे तत्त्वावर घेण्यात आली आहेत. नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी केले आहे.
 
पालिका रुग्णालयांमध्ये होणार
प्लेटलेट्सची मोफत तपासणी
खासगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रुग्णांची लूट सुरू केल्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये प्लेटलेट्सची मोफत तपासणी केली जाणार आहे. गाडीखाना येथील डॉ. कोटणीस दवाखाना, कमला नेहरू आणि नायडू रुग्णालयात ही तपासणी केली जाणार आहे. सध्या नायडू, कमला नेहरूमध्ये प्रत्येकी २२० तर, वाडिया रुग्णालयामध्ये ८० अशा एकूण ५२० खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कमला नेहरूमध्ये २० तर, वाडिया रुग्णालयात ५० अशा ७० खाटा वाढवून महापालिकेने रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता वाढविली आहे. वाडिया रुग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्याने क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील ११ डॉक्टरांना या रुग्णालयामध्ये नियुक्त करण्यात आले असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले.