‘कॅग’ने केलेल्या पाहणीत पुणे रेल्वे स्थानकाचाही समावेश

देशातील रेल्वे स्थानके आणि विविध गाडय़ांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ मानवी सेवनास अपायकारक असल्याचा अहवाल देशाचे महालेखापाल आणि नियंत्रकांनी (कॅग) नुकताच संसदेत मांडला. ‘कॅग’ने केलेल्या पाहणीमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. स्वच्छतेसाठी देशातील पहिल्या दहा रेल्वे स्थानकांमध्ये समावेश झालेल्या पुणे स्थानकात मिळणारे खाद्यपदार्थही अस्वच्छ आणि अपायकारक असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

रेल्वेतील खाद्यपदार्थाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत ‘कॅग’ने केलेल्या पाहणीचा अहवाल १९ जुलैला संसदेत मांडण्यात आला. भेसळयुक्त आणि अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले खाद्यपदार्थ, शिळे पदार्थ पुन्हा ताजे करण्याचे प्रकार, मुदत संपलेले पाकीटबंद पदार्थ, परवाना नसलेल्या कंपन्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आदी विविध आक्षेप नोंदवित हे पदार्थ मानवी सेवनास अपायकारक असल्याची टिप्पणी ‘कॅग’ने संसदेत केली. रेल्वेतील खानपान व्यवस्थेबाबत रोजच प्रवाशांकडून तक्रारी होत असल्या, तरी ‘कॅग’च्या या अहवालाने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

‘कॅग’ने देशभरातील ७४ रेल्वे स्थानके आणि महत्त्वाच्या गाडय़ांमध्ये याबाबतची पाहणी केली. त्यात पुणे स्थानकातील पाहणीचाही समावेश आहे. स्वच्छतेच्या कामात पुणे स्थानकाला देशात नववा क्रमांक मिळाला आहे. स्थानक आणि परिसरातील स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, खानपान व्यवस्थेतील स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याचे ‘कॅग’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा म्हणाल्या, की रेल्वेतील खानपान सेवेबाबत प्रवासी रोजच विविध माध्यमांतून तक्रारी करीत असतात. रेल्वे प्रशासनाने त्याची कधीच गंभीर दखल घेतली नाही. आता ‘कॅग’नेच कान टोचल्याने रेल्वेकडून काय सुधारणा केली जाणार हे पहावे लागणार आहे. खानपान व्यवस्थेचे रोज निरीक्षण करणे अपेक्षित आहे, ते योग्य प्रकारे होत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. खानपानविषयक बहुतांश सेवा ठेकेदारी पद्धतीने दिली जाते. मुख्य ठेकेदार उपठेकेदाराला ते काम देतो. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहत नाही. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे स्थानकात किंवा गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांवरही कोणती कारवाई केली जात नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये स्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांनाही स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळायला हवेत. खानपान सेवेतून रेल्वेला मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळते. त्यामुळे ही सेवा रेल्वेने स्वत:च चालवावी.