वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या कामात जनसहभाग आवश्यक असून यासाठी सामाजिक वनीकरण विभाग स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुढाकार घेणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व उपमहासंचालक डॉ. अनिलकुमार झा यांनी दिली. पर्यावरण, वृक्षारोपण व वनसंवर्धन क्षेत्रातील विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘सह्य़ाद्री जनवनवार्ता’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
विविध राष्ट्रीय, धार्मिक व पर्यावरण विषयक दिनाच्या निमित्ताने उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सह्य़ाद्री जनवनवार्ता हे त्रमासिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे सरफराज खान यांनी सांगितले. कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षक सरफराज खान, ‘बायोस्फियर्स’ चे डॉ. सचिन पुणेकर, नानासाहेब लडकत हरित मित्र परिवाराचे संघटक महेंद्र घागरे, सहायक जनसंपर्क अधिकारी सुनील खरात, सहायक संचालक व्ही.व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी हळद, उंडल, कारंबळ, अर्जुन, बेल अशा २८ प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्य़ांत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जागृती या संबंधीच्या कार्यक्रमांबद्दल माहिती या वेळी देण्यात आली.