लोकशाहीची जाण नसणाऱ्या १८ वर्ष वयाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार दिला. मतदानाच्या वेळी मद्याची प्रलोभने दाखवली जात असल्याने आजची पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे. यासाठी आजच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये बदल करून चारित्र्य आणि व्यसनमुक्तीच्या जागृतीचे धडे दिले पाहिजेत, असे मत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत, संयुक्त महाराष्ट्रच कायम राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठवाडा युवा मंचच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. निलंगेकर बोलत होते. भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे यांना या वेळी निलंगेकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, लातूर जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते रामभाऊ तिरुके, सहायक पोलिस आयुक्त राम मांडुरके, महाराष्टृ प्रदूषण नियंत्रण अधिकारी भगवान माकणीकर, डॉ. सोमनाथ रोडे, श्रीराम आकोसकर, मंचचे अध्यक्ष सत्यजित चौधरी, अभिजित मजगे आदी उपस्थित होते.

डॉ. निलंगेकर म्हणाले, भारत इंग्रजाच्या तावडीतून मुक्त झाला, त्या वेळी ५६३ संस्थाने होती. संस्थानिकांना स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी दबाव टाकू नये अशी अट इंग्रजांनी घातली होती. तरीही ५६१ संस्थानिकांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. फक्त हैदराबाद आणि काश्मीर या संस्थानिकांनी स्वतंत्र भारतात विलीन न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा द्यावा लागला. मराठवाडा मुक्त झाल्यानंतर राज्य पुर्नरचना आयोगाची स्थापना झाली. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्राला अनेकांचा विरोध होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे गेले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर बोलताना निलंगेकर म्हणाले, महाराष्टृाचे तुकडे पडू नयेत. विदर्भ, मराठवाडा वेगळे मागण्याची भाषा चुकीची आहे. अनुशेष राहिला असेल मात्र ते कारण वेगळपणासाठी होऊ शकत नाही. संयुक्त महाराष्टृच कायम राहिला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यजित चौधरी यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र कोरे यांनी केले. आभार फुलचंद गोडसे यांनी मानले.