माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचा विश्वास

जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारसह सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या योजनांना यश मिळत असून काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यात लवकरच यश येईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी व्यक्त केला.

‘सरहद’ संस्थेतर्फे आयोजित काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन जयराम रमेश यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. जम्मू-काश्मीरचे पर्यटन संचालक मेहमूद शाह, फलोत्पादन संचालक महंमद हसन मीर, महोत्सवाचे संयोजक शैलेश पगारिया, आतिश चोरडिया, ‘सरहद’चे संजय नहार आणि शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते.

काश्मीरविना भारत अधुरा आहे, असे सांगून जयराम रमेश म्हणाले, मी राजकारणाचे बोलत नाही. पण, काश्मीरमधील अशांततेचे वातावरण निवळून शांती आणि सद्भाव प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. दहावी अनुत्तीर्णाना प्रशिक्षण आणि रोजगार देणारी ‘हिमायत’, काश्मिरी युवकांना रोजगार देणारी ‘उडान’ आणि महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देत त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारी ‘उम्मीद’ या योजना सुरू केल्या होत्या. हे करीत असताना सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पूर्ण करीत असल्याचीच आमची भावना होती.

राज्यातील सरकारच्या पर्यटन विभागानेही सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी रोड शो सुरू केले आहेत. पण, केवळ सरकार सारे करू शकणार नाही. त्यासाठी सरहदसारख्या संस्थांनीही योगदान देण्याची आवश्यकता आहे.

गेल्या वर्षी १३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. पूर्वी काश्मीरला गेल्यानंतर मला गुजराती आणि बंगाली ऐकायला मिळायचे. मात्र, आता तेथे मराठी बोलणारे लोकही अधिक दिसतात, असे निरीक्षण नोंदवून रमेश यांनी काश्मीरशी मी गेल्या २५ वर्षांपासून जोडला गेलो असल्याचे सांगितले. काश्मीरची सहवेदना पुण्याला समजते. आमच्यावर प्रेम करून आमच्या मुलांना पुण्याने आश्रय दिला आहे, असे मेहमूद शाह यांनी सांगितले. संजय नहार यांनी प्रास्ताविक केले.

दमा दम मस्त कलंदर

काश्मीरमधील लोकप्रिय गायक शफी सोपोरी आणि शमीमा अख्तर यांनी काश्मिरी, हिंदूी गीतांसह काही सूफी रचना सादर करून महोत्सवामध्ये अनोखा रंग भरला. ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ या हिंदूी गीतासह ‘दमा दम मस्त कलंदर’ या शफी सोपोरी यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. गायन करताना तल्लीन झालेल्या शफी यांनी बाटलीतील पाणी डोक्यावर ओतून घेतले आणि गायन सुरू ठेवले, तेव्हा रसिकांनी टाळ्यांच्या गजर केला.