महाराष्ट्राबाहेर मराठय़ांच्या संपर्कात आलेल्या किल्ल्यांची छायाचित्रे पाहण्याची संधी किल्लेप्रेमींना मिळणार आहे. झुंजार शिलेदार सेवा समितीतर्फे या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून शिवकालीन घराण्यांच्या वंशावळींना सापडलेली काही अप्रकाशित कागदपत्रे देखील या प्रदर्शनात मांडली जातील.
संस्थेच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात ९ ते १२ मे दरम्यान सकाळी ९ ते रात्री ८ यादरम्यान हे प्रदर्शन भरवले जाणार असून ते विनामूल्य पाहता येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्त्याने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राबाहेर राजस्थान, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांपासून अगदी पाकिस्तानपर्यंतच्या प्रदेशात मराठय़ांचा कोणकोणत्या किल्ल्यांशी संपर्क आला त्याविषयी या छायाचित्रांमधून माहिती मिळेल. शिवकालीन घराण्यांच्या वंशावळींचे शिक्के, या घराण्यांमध्ये सापडलेली अप्रकाशित कागदपत्रेही आणि शिवकालीन शस्त्रेही या ठिकाणी मांडली जातील.
१४ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ‘पराक्रमी मराठे’ या विषयावर मांडे यांचे व्याख्यान होणार आहे, तर १८ मे रोजी सायं. ५ ते ८ याच वेळात डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘महाराणी ताराराणी’ यांच्याविषयी व्याख्यान होणार आहे.