बांधकाम व्यावसायिक मोकळेच; अद्याप अटक नाही
बालेवाडीतील पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पाच्या आवारात बेकायदेशीर रीत्या बांधण्यात येणाऱ्या तेराव्या मजल्यावरील स्लॅब कोसळून नऊ मजुरांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांनी मंगळवापर्यंत (२ ऑगस्ट) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रकल्प व्यवस्थापकोसह चौघांचा समावेश आहे. मात्र, अद्याप या दुर्घटनेस जबाबदार असणारे आणि पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पाचे भागीदार असलेल्या चार बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्यात आली नाही.
भावीन हर्षद शहा (वय ३४, रा.एनआयबीएम रस्ता, कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (वय ३५, विवेकनगर, आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. नवी सांगवी) आणि श्रीकांत किसन पवार (वय ४४, रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहा हे प्रकल्प व्यवस्थापक आहेत. दोघे चव्हाण प्रकल्प पर्यवेक्षक आहेत. तर पवार त्यांच्याकडे कामाला आहेत. चौघांना चतु:शंृगी पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले.
पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पातील तेरावा मजला बांधण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. गृहप्रकल्पाचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनीच्या नोंदणीसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. बांधकामसंदर्भातील कराराची कागदपत्रांची पाहणी करायची आहे. स्लॅब बांधण्यासाठी येणाऱ्या सिमेंट क्राँकीटच्या दर्जाची तपासणी करायची आहे. आरोपींच्या घराची झडती घेण्यात येणार आहे. परवानगी आणि अन्य कागदपत्रे महापालिकेकडून मिळवायची आहेत. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील अ‍ॅड.मिलिंद दातरंगे यांनी न्यायलयाकडे केली. न्यायालयाने चौघांना २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींतर्फे अ‍ॅड. नंदू फ डके व अ‍ॅड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली.
पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पाच्या दुर्घटनेस जबाबदार असणारे श्रीनिवास डेव्हलपर्स व प्राइड पर्पल प्रॉपर्टीजचे अरविंद जैन, समर्थ ग्रुपचे श्रवण अगरवाल, अभिनव ग्रुपचे कैलास वाणी, श्याम शेंडे यांच्यासह महेंद्र चव्हाण, भाविन शहा, संतोष चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रदीप कुसुमकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी (२९ जुलै) रात्री चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटून गेले, तरी अद्याप बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्यात आलेली नाही.