शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह चौघांचे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. सोमवार पेठेतील खडीचे मैदान येथे कौटुंबिक वादातून पतीचा महिलेने डोक्यात पाटा घालून खून केला, तर भोसरीत पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचा  तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान खडकी आणि कोंढवा परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणांचे खून झाले.
सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात कौटुंबिक वादातून संजय जगताप (वय ५५) यांच्या डोक्यात त्यांच्या पत्नीने स्वयंपाकघरातील दगडी पाटा घालून खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. जगताप हे एका शाळेत प्रयोगशाळेत मदतनीस म्हणून काम करत होते. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने जगताप दाम्पत्यात कायम वाद व्हायचे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जगताप यांच्या पत्नीने त्यांच्या डोक्यात पाटा घातल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांची पत्नी नातेवाईकांकडे निघून गेली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली, असे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान बुधवारी सायंकाळी भोसरीतील धावडे वस्तीत राहणाऱ्या सारिका अंकुश भवारी (वय ३५) या महिलेचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सारिका मूळच्या संगमनेरच्या असून पाच वर्षांपूर्वी त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यांची मुले मंचर येथील एका वसतिगृहात राहायला आहेत. भोसरीतील औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत त्या नोकरी करत होत्या. त्यांच्या घरातून दरुगधी येऊ लागल्याने घरमालकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा सारिका यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
खडकी परिसरात मित्रांसोबत दुचाकीवरून पडलेल्या पुतण्याला समज देणाऱ्या काकाचा पुतण्या आणि त्याच्या दोन मित्रांनी खून केल्याची घटना मध्यरात्री घडली. असीम मोहमंद शहा (वय ३०, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी बाजार) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी शहा यांचा पुतण्या इसाक ऊर्फ पापा हकीम शहा (वय १९), त्याचे मित्र विजय वसंत शिंदे (वय १९) आणि दाऊद दिलावर शेख (वय १९) यांना गजाआड केले. असीम याचे वडील मोहमंद शरीफ शेख (वय ६०) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दरम्यान, कोंढव्यातील गोकुळनगर परिसरात एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.