खडकवासला गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटीलबुवा मते यांच्या चार ट्रक चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी पेटवल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. चारही ट्रक जळून खाक झाले असून, मते यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास हवेली पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटीलबुवा मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी आहे. शिवजयंतीनिमित्त दोन दिवसांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ट्रक नेहमीच्या जागी पार्क केले नव्हते. बंगल्यापासून ४० ते ५० फुटांवर त्यांनी ट्रक पार्क केले होते. मध्यरात्री अडीच ते पावणेतीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी ट्रक पेटवून दिले. ट्रकला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश मिळाले. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ट्रक जळून खाक झाले असून, एक कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून, त्याद्वारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.