आवश्यक पायाभूत सुविधा नसल्यामुळे पुणे विद्यापीठामध्ये अथवा संलग्न महाविद्यालयामध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून एक वर्षांचा एलएलएम अभ्यासक्रम सुरू होणे शक्य नसल्याचे मत विधी अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ. रशिद शेख यांनी व्यक्त केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने एलएलएम अभ्यासक्रम एक वर्षांचा करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी काही निकष केले आहेत. त्या निकषांमध्ये पुणे विद्यापीठ बसत नसल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून एक वर्ष कालावधीचा एलएलएम अभ्यासक्रम पुणे विद्यापीठामध्ये सुरू होऊ शकत नाही, असे डॉ. शेख यांनी स्पष्ट केले आहे. ‘‘डॉ. शेख म्हणाले, ‘‘एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रम सुरू  करण्यासाठी टेलिकॉन्फरन्सिंगची सुविधा, माहिती तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान असलेले शिक्षक आणि कर्मचारी यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवणे, दर पाच विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे आवश्यक आहे. सध्या पुणे विद्यापीठांतर्गत असलेले एकही महाविद्यालय या निकषांची पूर्तता करत नाही. त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापन परिषदेची, विद्वत सभेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून एक वर्षांचा एलएलएम अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरू होऊ शकत नाही.’’ दोन वर्षे कालावधीचा एलएलएम अभ्यासक्रम आणि एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये एकाच वेळी चालवता येणार असल्याने एक वर्षांचा एलएलएम अभ्यासक्रम हा दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला पर्याय ठरू शकत नाही असेही डॉ. शेख यांनी म्हटले आहे.