पुणे शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीला (डेव्हलमेंट कंट्रोल रेग्युलेन्शन अ‍ॅण्ड रुल्स- डीसी रूल्स) मान्यता देताना मेट्रो बरोबरच बीआरटी मार्गाच्या नियोजित हद्दीमध्येही किमान दोन ते कमाल चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटपर्यंत दोन ते चार एफएसआय मिळणार असून त्याच्या वापराने फार मोठय़ा संख्येने इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेट्रो आणि बीआरटी या ‘मास ट्रान्झिट रॅपिड सिस्टिम’च्या मार्गाच्या नियोजित हद्दीमध्ये दोन ते चार एफएसआय देण्याच्या निर्णयाची अंमलबाजवणी होणार आहे. या दोन्ही मार्गाच्या बाजूने बांधकामासाठी कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त चार एफएसआय मिळणार असून एफएसाय वापरताना सदनिकांचा आकार कमीत कमी २४ चौरस मीटर आणि जास्तीत जास्त १२० चौरस मीटर ठेवणे बंधनकारक असेल. त्यामुळे जास्त लोकसंख्या या ठिकाणी राहू शकेल, तसेच परवडणाऱ्या आणि स्वस्त घरांची निर्मितीही त्या माध्यमातून होऊ शकेल,’ असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

[jwplayer sPPOdHFV]

मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणावर एफएसआय देण्यास शहरातील राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी तीव्र विरोध केला होता. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या लोकसंख्येला आवश्यक तेवढय़ा पायाभूत सुविधा पुरविण्यास महापालिका प्रशासनाला अडचणी येत आहेत. वाढीव एफएसआय दिल्यास सदनिकांच्या संख्येत मोठी वाढ होऊन पायाभूत सुविधांवरही ताण येईल. त्यामुळे चार एफएसआय नको, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता कमाल चार एफएसआय वापरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना मोठय़ा संख्येने इमारती उभ्या राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी पन्नास मीटर असा एकूण शंभर मीटर अंतराच्या परिसरात चार एफएसआय देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. विकास आराखडा करताना नगर नियोजन समितीने ही शिफारस वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विकास आराखडय़ाला मंजुरी देताना मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूला एफएसआय देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. विकास आराखडय़ातही ही बाब स्पष्ट झाली होती. त्यानंतर गुरुवारी विकास नियंत्रण नियमावलीला मान्यता देताना मेट्रो आणि बीआरटीच्या मार्गावर चार एफएसआय देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या आधीच्या प्रस्तावानुसार फक्त मेट्रो मार्गासाठी एफएसआय प्रस्तावित होता. त्यात नियमावलीला मंजुरी देताना बीआरटीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एफएसआय मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होईल.

[jwplayer ABIQoBul]