‘‘आळंदीच्या विकासासाठी हात आखडता घेतला जाणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आळंदीत दिले. ‘सेवाभावी वृतीने कार्य करणाऱ्या संस्थांच्या जागेबाबतच्या अडचणी दूर करण्यात येतील, त्यासाठी वेळप्रसंगी नियमात शिथिलता आणली जाईल,’ अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.
रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनने उभारलेली धर्मशाळा आणि वारकरी संप्रदाय प्रशिक्षण केंद्र या वास्तूंच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रसिकलाल धारिवाल, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आमदार दिलीप वळसे पाटील, लक्ष्मण जगताप, शरद सोनावणे, सुरेश गोरे, मंदा म्हात्रे, आळंदी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, प्रकाश धारीवाल, आचार्य किशोरजी व्यास, शोभा धारीवाल, भगवान थोरात, उमाजी पानसरे, संदीपन महाराज िशदे, डॉ प्रशांत सुरु, आबा बागुल, संजय घुन्दरे आदी उपस्थित होते.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘आळंदीच्या विकासाबाबत करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हात आखडता घेण्यात येणार नाही. आळंदीच्या विकास आराखडय़ाबाबत अंतिम सुनावणी घेऊन मान्यता देण्यात येईल. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबतही कार्यवाही करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडावे. त्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे.आळंदीच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही सोडवण्यात येईल. आळंदीच्या यात्रा अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनुदान २ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. आळंदीच्या विकासासाठी हात आखडता घेण्यात येणार नाही. केंद्र शासनाकडूनही अधिक निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’