चांगले पैसे मिळतात म्हणून अनेक टुकार सिनेमेही केले, ते करावेच लागतात. चांगल्या सिनेमांना कमी पैसे मिळतात. एखादा चांगला सिनेमा केला की नाईलाजाने काही टुकार सिनेमे करावेच लागतात, तुम्ही रसिक प्रेक्षकांनी आम्हा कलावंतांना समजून घ्यावे, कारण सलग चांगले चित्रपट कोणालाही देता येत नसतात, अशी भावना अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी भोसरीत व्यक्त केली. ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटाच्या वेळी सेन्सॉर बोर्डाचा आलेला विचित्र अनुभव अनासपुरे यांनी यावेळी प्रथमच जाहीरपणे सांगितला.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी आयोजित गदिमा कविता महोत्सवात अनासपुरे यांना गदिमा कलागौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जीवनगौरव, डॉ. विलास साबळे यांना स्नेहबंध, कवी अनिल कांबळे यांना काव्यप्रतिभा आणि परशुराम बोऱ्हाडे यांना उद्योग विकास पुरस्काराने गौरवण्यात आले. गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर, डॉ. माधवी वैद्य, डॉ. पी. डी. पाटील, मुरलीधर साठे आदी उपस्थित होते. यावेळी भोसरीतील श्रीराम विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या रकमेतून गोळा केलेल्या ४५ हजाराचा निधी ‘नाम’ संस्थेसाठी दिला.
अनासपुरे म्हणाले, आतापर्यंत कलेची मनापासून सेवा केली, समाजव्यवस्थेवर उपहासात्मक व गंभीर भाष्यही केले, त्याची समाजाने नोंद घेतली, याचे समाधान वाटते.
नायक म्हणून ‘कायद्याचं बोला’ हा पहिलाच चित्रपट होता. तंबाखूचा संदर्भ असलेले एकमेव गाणे त्यात होते. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ठरली असताना सिनेमा व प्रेक्षकांच्या मध्ये असलेल्या सेन्सॉर बोर्डाने ते गाणे कापण्यास सांगितले. ते तोडता येत नव्हते, असे वारंवार सांगून पाहिले. मात्र, बोर्डाने आमचे ऐकले नाही. सेन्सॉर बोर्ड असावे. मात्र, ते संयुक्तिक असावे, अशी अपेक्षा मकरंदने व्यक्त केली.