मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात; यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष

नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि काही प्रमाणात आर्थिक मंदीचे वातावरण असले, तरी सारी विघ्ने दूर करणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत असल्याने ढोल-ताशांचा निनाद आणि सुमधुर गीतांचे वादन करणारी बँडपथके यांच्या सहभागाने छोटेखानी मिरवणुका काढून शुक्रवारी (२५ ऑगस्ट) गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. मानाच्या गणपतींची मध्यान्हीपूर्वीच प्रतिष्ठापना होणार आहे. कार्यकर्त्यांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले असून प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीची प्रतिष्ठापना महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. त्यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक रथातून गणपतीची मिरवणूक उत्सव मंडपापासून सुरू होईल. शिवछत्रपती, समर्थ, श्रीराम आणि उमग या चार ढोल-ताशा पथकांचा सहभाग असलेली मिरवणूक बुधवार चौक, जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर या मार्गाने उत्सव मंडपामध्ये येईल.

अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मिरवणूक सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून सुरू होणार आहे. सामाजिक संदेश देणारे नूमवि मुलींच्या प्रशालेचे ढोल-ताशापथक आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भय्या चौक, झुणका-भाकर केंद्रमार्गे मिरवणूक उत्सव मंडपामध्ये येईल. शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे त्र्यंबकेश्वर येथील पीरयोगी गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून सकाळी आठ सुरू होणाऱ्या मिरवणुकीत महिला कार्यकर्त्यांच्या पथकासह स्वरझंकार दरबार ही बँडपथके सहभागी होणार आहेत. बेलबाग चौक, बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक, िलबराज महाराज चौक, मंडई येथे लोकमान्यांच्या पुतळ्यास वंदन करून हुतात्मा बाबू गेनू चौकातून मिरवणूक उत्सव मंडपात येणार आहे.

तुळशीबाग गणपतीची मूर्तिकार देगलूरकरांच्या हस्ते प्रतिष्ठापना

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून सुरू होणाऱ्या मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा असेल. नूमवि, नादब्रह्म, श्री महादुर्गा आणि उगम या ढोल-ताशापथकांचा सहभाग असेल.

कसबा गणपतीची भिडेंच्या हस्ते प्रतिष्ठापना

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना ११ वाजून ५६ मिनिटांनी सांगली येथील संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने १२५ सुवासिनी गणपतीचे औक्षण करणार आहेत. त्यापूर्वी सकाळी सव्वादहा वाजता उत्सव मंडपापासून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून हमालवाडा येथील नीलेश पार्सेकर यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतली जाणार आहे. तेथून अप्पा बळवंत चौक, तांबडी जोगेश्वरी चौक, बुधवार चौक आणि लाल महाल या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात येईल. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, आदिमाया ढोल-ताशापथक, नवीन मराठी शाळेचे लेझीमपथक आणि प्रभात बँडपथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल.

गुरुजी तालीममिरवणुकीच्या अग्रभागी नादब्रह्म

सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक गणपती चौकापासून सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये येईल. महिलांचा सहभाग असलेले नादब्रह्म हे पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. गर्जना, शिवगर्जना आणि गुरुजी प्रतिष्ठान या ढोल-ताशापथकांचा समावेश असेल. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असून उद्योजक सुकन शहा यांच्या हस्ते दुपारी पाऊण वाजता गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे.

केसरीवाडाच्या गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून

केळकर रस्त्यावरील मूर्तिकार गोखले यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर श्री केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघेल. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडावादन मिरणुकीच्या अग्रभागी असेल. श्रीराम ढोल-ताशापथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना होईल. उत्सव काळात केसरीवाडा येथे दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

तांबडी जोगेश्वरी मंडळाची १०.३० वाजता मिरवणूक

शनिवार पेठ येथील गोखले मूर्तिकार यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची सकाळी साडेदहा वाजता मिरवणूक सुरू होणार आहे. आढाव बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, शिवमुद्रा आणि ताल या ढोल-ताशापथकांसह न्यू गंधर्व ब्रास बँड मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. पारंपरिक चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान असेल. मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षी व्यापारी समीर शहा यांच्या हस्ते दुपारी सव्वाच्या सुमारास गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.