गणेशोत्सवानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन  गुरुवारी (२४ ऑगस्ट) आणि प्रतिष्ठापनेच्या दिवशी शुक्रवारी (२५ ऑगस्ट) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. उत्सवाच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

श्री गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त भाविक खरेदीसाठी डेंगळे पुल ते शिवाजी पुलादरम्यान थाटण्यात आलेल्या दुकानांमध्ये गर्दी करतात. कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक येथेही मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुकाने थाटली आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी सहा ते रात्री अकरा दरम्यान बदल करण्यात आले आहेत. शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैया चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, देवीदास पाटील, महादेव गावडे, जयश्री गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) विवेकानंद वाखारे उपस्थित होते.

वाहतूक व्यवस्थेतील बदल पुढीलप्रमाणे-शिवाजी रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहचालकांनी संताजी घोरपडे पथ , कुंभार वेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे पुणे स्टेशनकडे जावे. सूर्या हॉस्पिटल, पवळे चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, नरपतगिरी चौकमार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरहून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगलीमहाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे. कुंभारवेस चौक-डेंगळे पूल ते शिवाजी पूल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील.

वाहतुकीसाठी खुले रस्ते (एकेरी वाहतूक आणि जड वाहनांना प्रवेशबंदी)-फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज (शनिवारवाडा), अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक.

मूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहने लावण्याची व्यवस्था-न्यायमूर्ती रानडे पथ कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा, वीर संताजी घोरपडे पथ, गाडगीळ पुतळा चौक,  जयवंतराव टिळक पूल ते  भिडे पूल (नदीपात्रातील रस्ता), मंडई येथील मिनव्‍‌र्हा व आर्यन चित्रपटगृहाच्या जागेवरील वाहनतळ, शाहू चौक (फडगेट पोलीस चौकी) ते राष्ट्रभूषण चौक (रस्त्याच्या डाव्या बाजूला).

पीएमपी बसमार्गातील बदल पुढीलप्रमाणे-शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) शिवाजी पूल या मार्गाने जाणार नाहीत. जंगलीमहाराज रस्ता, टिळक चौक मार्गे टिळक रस्त्याने बस धावतील. महापालिका भवन येथून जाणाऱ्या बस स्वारगेटकडे जाणाऱ्या झाशीची राणी चौकमार्गे जंगलीमहाराज रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने धावतील. महापालिक भवन येथून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बस साठे चौक, कामगार पुतळामार्गे स्टेशनकडे जाणार नाहीत. शिवाजी चौक, स.गो. बर्वे चौक, वेधशाळा चौक, संचेती भुयारी मार्ग, कामगार पुतळामार्गे शाहीर अमर शेख चौक मार्गे पुणे स्टेशनकडे बस जातील.

अथर्वशीर्ष पठणानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर शनिवारी (२६ ऑगस्ट) येथे पहाटे पाच वाजल्यापासून अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी रस्ता (जिजामाता चौक ते रामेश्वर चौक), अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत करण्यात येईल.

उत्सवाच्या कालावधीत वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त

  • एक पोलीस उपायुक्त
  • चार सहाय्यक आयुक्त
  • १३९६ पोलीस
  • वाहतूक वॉर्डन
  • तक्रारीसाठी व्हॉटसअ‍ॅप क्रमांक-८४११८००१००

वाद घालू नका..

उत्सवाच्या कालावधीत मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतुकीच्या नियोजनासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. पोलिसांनी नागरिकांना सूचना द्यावा. शक्यतो वादाचे प्रसंग टाळावेत. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे.