गणेशोत्सवासाठी मातीचीच गणेश मूर्ती वापरण्यात यावी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्यात येऊ नयेत, मूर्तीचे घरीच विसर्जन करावे अशा विविध मुद्दय़ांवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी गेली अनेक वर्षे चळवळ सुरू आहे. त्यातच पुढील पाऊल एका कलाकाराने उचलले आहे. आपल्या पोटातच विविध वृक्षांच्या बिया सामावून घेणाऱ्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर त्याचे झाड होणार आहे.

हळूहळू बाजारपेठेने गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. कलाकारांकडून गणेशाच्या मूर्तीची निर्मितीही करण्यात येत आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाबाबत गेली अनेक वर्षे विविध स्तरातून जागृती करण्यात येत आहे. याबाबतच दत्ताद्री कोठूर या शिल्पकाराने नावीन्यपूर्ण कल्पना मांडली आहे. विसर्जनानंतर मूर्तीच्या मातीतून झाडाला जन्म देणारा ‘ट्री गणेशा’ सध्या समाजमाध्यमांवर गाजतो आहे. लाल माती आणि नैसर्गिक खते एकत्र करून त्यापासून गणेशाची मूर्ती साकारण्यात येणार आहे. ही मूर्ती साकारताना त्याच्या पायामध्ये बिया ठेवण्यात येतील. त्यानंतर नैसर्गिक रंगात साकारलेली ही मूर्ती गणेशोत्सवात पुजण्यासाठी तयार होईल. कुंडीतच साकारण्यात आलेल्या या मूर्तीवर झारीने पाणी ओतून त्याचे विसर्जन करायचे. पाणी घातल्यानंतर मूर्ती दोन दिवसांमध्ये विरघळून त्याची माती कुंडीत पसरेल. त्यानंतर या मातीतून रुजत घातलेल्या बियांची रोपे ७ ते ८ दिवसांत तयार होतील. लहान, मध्यम आणि मोठय़ा अशा तिनही स्वरूपात या मूर्ती उपलब्ध आहेत.

समाजमाध्यमांवर सध्या रोपटय़ाची निर्मिती करणाऱ्या गणेश मूर्तीची चर्चा रंगली आहे. दरवर्षी घरातील गणेशोत्सवासाठी काहीतरी वेगळे आणि पर्यावरणपूरक करावे यातून या गणेशमूर्तीची संकल्पना कोठूर यांना सुचली. गेल्यावर्षी घरातील गणेशमूर्ती साकारण्यात आली. त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर खूपच गाजली आणि त्यातून या वर्षीपासून या मूर्ती सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचे कोठूर यांनी ठरवले. सोमवारपासून या मूर्तीची नोंदणी सुरू करण्यात आली आणि अवघ्या एका दिवसांत साधारण ४०० मूर्तीची नोंदणी झाल्याचे कोठूर यांनी सांगितले.

पुणे आणि मुंबईत या मूर्ती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबाबत कोठूर यांनी सांगितले, ‘समाजमाध्यमांवर मिळालेल्या प्रतिसादामुळे या मूर्ती सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या यामध्ये भेंडीच्या बिया ठेवण्यात आल्या आहेत. कारण त्या लवकर रुजतात आणि टिकू शकतात. मात्र अजून कोणत्या रोपांच्या बिया ठेवता येतील का याबाबतही अभ्यास सुरू आहे. काही जणांनी फुलझाडांच्या बिया ठेवण्याबाबत विचारणा केली आहे. त्याचाही विचार करण्यात येत आहे. कमी पाणी, कमी सूर्यप्रकाशांत होऊ शकतील अशी रोपे यातून तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.’