दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांसह खरेदीदारांना त्रास; आडते संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या आवारात साठलेला कचरा उचलण्यास बाजार समितीतील सफाई कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार आवारात फळभाज्यांचा कचरा साठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे कचरा भिजला असून बाजार आवारात दुर्गंधी पसरली आहे. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कचरा हटवण्याचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान, बाजार आवारातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष तसेच तातडीने कचरा न हटविल्यास आडते संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

आशियातील खंडातील दुसऱ्या क्रमाकांचे बाजारआवार अशी ख्याती असलेल्या मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साठले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बाजार आवाराची देखभाल ठेवली जाते. सफाई कर्मचाऱ्यांकडून बाजार आवाराची नियमित स्वच्छता केली जात नसल्यामुळे बाजार आवारात दुर्गंधी पसरली आहे. दररोज मार्केट यार्डच्या आवारात परराज्य तसेच राज्याच्या विविध भागातून शेतकरी, खरेदीदार येतात. दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी, खरेदीदारांना त्रास होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे कचरा कुजला आहे. कुजलेल्या कचऱ्याचा वास असह्य़ होत असल्याच्या तक्रारी बाजार आवारातून करण्यात आल्या.

फळबाजार, भाजीपाला बाजार, फुल बाजाराचा भाग अठ्ठावीस एकरावर वसलेला आहे. बाजार आवारात साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. सध्या साथीचे आजार सुरू आहेत. कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. या संदर्भात बाजार समितीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, बाजार आवारातील कचरा हटविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. येत्या रविवापर्यंत कचरा न हटविल्यास आडते संघटनेकडून बैठकीचे आयोजन केले जाईल. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिला.  बाजार आवारात दररोज मोठय़ा प्रमाणावर उलाढाल होते. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सेस (कर) गोळा केला जातो. बाजार आवारातील समस्यांकडे बाजार समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे.