X

प्रशासनासाठी कचरा प्रकल्प डोकेदुखी

कचरा प्रकल्प ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली असल्याची परिस्थिती आहे. 

एक कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला, तर दुसरा बंद

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले असतानाच विरोध होत असलेला किंवा बंद पडलेला प्रकल्प सुरू करण्यात यश येत नाही तोच दुसरा प्रकल्प बंद होत असल्यामुळे महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. हडपसर येथील प्रस्तावित प्रक्रिया प्रकल्प सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता सूस रस्त्यावरील प्रक्रिया प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडला आहे. त्यामुळे कचरा प्रकल्प ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली असल्याची परिस्थिती आहे.

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चारही भागांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यानुसार काही ठिकाणी प्रक्रिया प्रकल्पही उभारण्यात आले आहेत. मात्र बहुतांशी प्रकल्प बंदच असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. जे प्रकल्प सुरू आहेत ते अपेक्षित क्षमतेने सुरू असल्याबाबतही शंका आहे.

काही दिवसांपूर्वी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी या गावातील कचरा प्रक्रिया प्रकल्प हटवावा, यासाठी आंदोलन केले होते. त्यानुसार साडेसातशे मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प हडपसर परिसरात स्थलांतरित करण्यात आला आहे. प्रकल्प उभारणीचे आणि तो सुरू करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी या प्रकल्पाला विरोध केला. हडपसर परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्प नकोच, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावरून गेल्या काही दिवसांपर्यंत आंदोलनही सुरू होते. हा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील गटनेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये प्रकल्पाबाबत तक्रारी आल्यास प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हडपसर येथील प्रस्तावित प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असतानाच सूस रस्त्यावरील प्रक्रिया प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडला आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागापुढील पेच वाढला आहे.

सूस रस्त्यावरील हा प्रकल्प बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर महापालिकेने उभारला आहे. नोबेल एक्सचेंज या कंपनीकडून या प्रकल्पात प्रतिदिन ३५० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. विशेषत: शहरातील हॉटेलमधील वाया गेलेल्या अन्न पदार्थावर येथे प्रक्रिया केली जाते. नियम व निकष डावलून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात संघर्ष सुरू होता. चुकीच्या पद्धतीने आणि नियम-निकष डावलून हा प्रकल्प सुरू केल्याचे सांगत येथील स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. त्यानंतरही प्रशासनाने हा प्रकल्प सुरू ठेवला होता. मात्र अचानक प्रकल्पातील तांत्रिक कारणांमुळे तो बंद ठेवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.

महापालिका प्रशासनाने कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या बृहत् आराखडय़ातही कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले. मात्र  प्रकल्पांसाठी भूसंपादन अडचणीचे ठरत असून भूसंपादन झाल्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्पांनी प्रशासनापुढे पेच निर्माण केल्याचे स्पष्ट झाले असून कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे शहरातील समस्येतही वाढ झाली आहे.

प्रकल्प वारंवार बदं

शहरात प्रतिदिन पंधराशे ते सोळाशे मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. हंजर, रोकेम, नोबेल एक्सचेंज, अजिंक्य बायोफर्ट, दिशा वेस्ट मॅनेजमेंट या मोठय़ा प्रक्रिया प्रकल्पांबरोबरच एकूण शंभर मेट्रीक टनांच्या बायोगॅस प्रकल्पांची, पन्नास टनांच्या छोटय़ा प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी शहरात करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया प्रकल्पांच्या एकूण क्षमतेचा विचार केला, तर ती दोन हजार सहाशे मेट्रीक टन आहे. मात्र हे प्रकल्प काही महिने चालत असल्याचे आणि त्यानंतर बंद पडत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.

Outbrain