आमच्या घराजवळ मोबाईलचा टॉवर आहे. माझ्या होणाऱ्या बाळाला त्यापासून काही धोका असू शकतो का?..माझ्या पत्नीला मानसिक अस्वास्थ्यासाठी गोळ्या सुरू आहेत. गरोदरपणात तिने या गोळ्या घ्याव्यात की नको?..परवा ग्रहण आहे. गरोदर सुनेला बाहेर न जाता घरातच थांबायला सांगू का?.. बाळाच्या जन्मापूर्वी गरोदर स्त्रीबरोबरच घरातल्या इतरांनाही या प्रकारचे प्रश्न सर्वाधिक पडत आहेत.
पुण्यातून चालवल्या जाणाऱ्या ‘गर्भ स्वास्थ्य हेल्पलाईन’ला विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा दोन वर्षांचा अहवाल समोर आला असून त्यात सर्वाधिक म्हणजे २७ टक्के प्रश्न विविध प्रकारच्या ‘एक्सपोजर्स’ संबंधीचे होते. औषधे, दारू, ग्रहण, किरणोत्सर्ग अशा विविध गोष्टींचा गरोदर स्त्रीवर काय परिणाम होईल, असे या प्रश्नांचे स्वरूप होते.
ही हेल्पलाईन २०१० मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ‘प्रीनेटल मेडिसिन प्रोग्रॅम’तर्फे सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनचा २०१२ पर्यंतच्या अनुभवांचा अहवाल ‘इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या एप्रिल ते जून २०१५ या कालावधीसाठीच्या अंकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या हेल्पलाईनवर दोन वर्षांत आलेल्या एकूण ६९६ दूरध्वनींवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांमध्ये २७.४ टक्के प्रश्न वर नमूद केल्याप्रमाणे गरोदर स्त्रीवर विविध ‘एक्सपोजर्स’च्या होणाऱ्या परिणामांबद्दल होते. त्या खालोखाल १८.५ टक्के प्रश्न गर्भवतीला असलेल्या इतर आजारांमुळे बाळंतपणात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य गुंतागुंतींबद्दल होते. १४ टक्के दूरध्वनी मळमळ किंवा उलटय़ा होण्यासारख्या गरोदरपणातील तक्रारींबद्दल होते, तर इतर १४ टक्के दूरध्वनी प्रत्यक्ष बाळंतपण व त्यानंतर घ्यायची काळजी याविषयीचे होते.

 
गर्भ स्वास्थ्य हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक- ०२०- ४०१५१५००
हेल्पलाईनची वेळ- सकाळी १० ते दुपारी ४
दिवस- सोमवार ते शनिवार
 

‘डॉक्टरांकडे गेल्यानंतरही ज्या शंकांविषयी सविस्तर चर्चा करण्यास वेळ दिला जाऊ शकत नाही असे प्रश्न हेल्पलाईनवर विचारले जाऊ शकतात. वेगवेगळी औषधे, घरातील ताण-तणाव, घरातल्या व्यक्तींना असलेले आजार, गरोदरपणात झोप न येणे, उलटय़ा होणे, आहार काय असावा, अशा प्रश्नांचा त्यात प्रामुख्याने समावेश असतो. ग्रामीण भागातील स्त्रियांनाही याचा फायदा होऊ शकेल.’
 
– डॉ. कौमुदी गोडबोले, कन्सल्टंट क्लिनिकल जेनेटिसिस्ट, दीनानाथ रुग्णालय