गीताजयंतीच्या निमित्ताने रविवारी (२० डिसेंबर) ‘गौरव भगवद्गीतेचा’ या गीतेवर आधारित नावीन्यपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार आणि मूल्यशिक्षणाचे प्रभावी माध्यम असलेल्या गीतेमधील विचार प्रदर्शनातून मांडण्याची कल्पना प्रा. माधवी कवि यांची आहे. भगवद्गीतेतील विचारांचा प्रसार व्हावा आणि या माध्यमातून मूल्यशिक्षण व्हावे म्हणून त्या या प्रदर्शनाचे आयोजन अठरा वर्षांहून अधिक काळ करीत आहेत. विविध शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, विविध मंडळे आदी ठिकाणी त्यांनी या प्रदर्शनाचे आयोजन आतापर्यंत केले आहे. पुण्याबरोबरच मराठवाडा, प. महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्येही त्यांनी अशी प्रदर्शने आयोजित केली होती.
तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या कवि यांनी मराठवाडय़ात असताना गीता अर्थासह शिकवलीच; पण अनेक स्तोत्रेही त्यांनी त्या भागातील मुलांना, महिलांना शिकवली. लहान मुले, पालकांसह अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाला आणि त्यांनी तयार केलेल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमातून मुलांवर चांगले संस्कार होत असल्याचे कवि यांनी सांगितले.
तामस, राजस, सात्त्विक आहार या विषयापासून मूल्यशिक्षणापर्यंतच्या अनेक विषयांची माहिती देणारे हे प्रदर्शन चित्र व सुविचारांच्या माध्यमातून मांडण्यात येते. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरात रविवारी (२० डिसेंबर) दुपारी तीन ते आठ या वेळेत हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. प्रदर्शनात गीता-महिमा, दहाव्या अध्यायावर आधारित विभूती दर्शन, शास्त्र, थोर व्यक्तींचे गीता विचार इत्यादींची मांडणी या कलात्मकरीत्या केलेली असते.