मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली याने पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची टेहळणी (रेकी) केल्याची कबुली शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायालयासमोर दिली. तसेच कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी, ओशो आश्रम, ज्यू धर्मीयांच्या छबाड हाऊसची त्याने पाहणी केली होती. हेडली याने सात वर्षांपूर्वी पुण्याला भेट दिली होती. दरम्यान जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेला शनिवारी सहा वर्षे पूर्ण झाली.
मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली याची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विशेष न्यायालयात साक्ष सुरू आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप हे त्याची साक्ष नोंदवत आहेत. त्याने दिल्लीतील लष्करी महाविद्यालय आणि पुण्यातील दक्षिण मुख्यालयाची टेहळणी केली होती. मार्च २००८ मध्ये हेडली याने पुण्याला भेट दिली होती. त्यावेळी त्याने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ज्यू धर्मीयांच्या छबाड हाऊसची पाहणी केली होती. तसेच दहा दिवसांच्या कालावधीत त्याने पुण्यासह गोवा, राजस्थानातील पुष्कर येथेही भेट दिली होती.
हेडली याने कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी आणि ओशो आश्रमाची पाहणी केली होती, अशी नोंद पुणे पोलिसांकडे आहे. त्यावेळी तो कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये राहायला होता. त्यानंतर पुण्यातील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात सतराजण ठार झाले होते. जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाला शनिवारी सहा वर्ष पूर्ण झाली.
हेडली याने पुण्याला सन २००८ आणि मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यापूर्वी भेट दिली होती. सन २००९ मध्ये त्याला अमेरिकन तपासयंत्रणांनी अटक केली होती. त्याला तेथील न्यायालयाने ३५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांचे लक्ष असलेल्या पुण्यात महत्त्वाच्या लष्करी संस्था आहेत. त्याअनुषंगाने लष्करी अधिकारी आणि पुणे पोलिसांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांसंदर्भात बैठका होत असतात, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी स्पष्ट केले.