बाँबस्फोटाच्या मोठय़ा धक्क्य़ानंतर सावरून पुन्हा दिमाखात उभ्या राहिलेल्या कोरेगाव पार्कमधल्या 24german-bakery-2‘जर्मन बेकरी’ने आता विधी महाविद्यालय रस्त्यावरही पाऊल ठेवले आहे. २५ डिसेंबरला सुरू झालेल्या जर्मन बेकरीच्या या पहिल्या शाखेला महिन्याभरातच तुडुंब प्रतिसाद मिळू लागला असून आधी केवळ ‘कॉस्मो क्राऊड’ने गजबजणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये ‘पुणेकर’ ग्राहकही दिसू लागला आहे.
विधी महाविद्यालयाजवळच्या जर्मन बेकरीचे व्यवस्थापक श्रीकांत राजगुरू म्हणाले, ‘‘कोरेगाव पार्कमधील आमच्या मूळच्या शाखेत कॉस्मोपॉलिटन गर्दीच प्रामुख्याने दिसायची. अगदी दिल्ली आणि मुंबईहूनही लोक आवर्जून यायचे. पण ‘पुणेकर’ ग्राहकही हवा या उद्देशाने कोथरुडमध्ये शाखा सुरू करण्याचा विचार होता. गेल्या महिन्याभरात या शाखेला चांगला प्रतिसाद मिळत असून कोथरुडबरोबर अगदी पेठांमधला ग्राहकही येत आहे. स्फोटांनंतर कोरेगाव पार्कात नव्याने उभारलेल्या जर्मन बेकरीत जे ‘इंटिरिअर’ वापरले गेले तेच या शाखेतही कायम ठेवले आहे. भिंतीवर काढलेली मोठी चित्रे हे या वास्तूंचे वैशिष्टय़ आहे. वर्षभरात पुणे आणि मुंबईतही विस्ताराचा विचार असून आणखी एखादी शाखा या कालावधीत सुरू होऊ शकेल.’’
सिंबायोसिस, बीएमसीसी, एमएमसीसी आणि विधी महाविद्यालयाबरोबरच फिल्म इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांसाठीही ही शाखा म्हणजे एक हक्काचा कट्टा बनला आहे. तर संध्याकाळी ती सहभोजनासाठी जमलेल्या कुटुंबांनी गजबजते. येथे ‘बार’ देखील नव्याने सुरू करण्यात आला आहे. इथल्या पदार्थाबद्दल राजगुरू म्हणाले, ‘‘आमचा खिमा पाव सुरुवातीपासूनच लोकप्रिय आहे. त्याशिवाय सकाळच्या न्याहरीसाठी ७ ते ८ प्रकारची ऑम्लेट्स आम्ही बनवतो. स्पॅनिश ऑम्लेट, जर्मन सॉसेज ऑम्लेट आणि खास भारतीय चवीच्या- फक्त कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेल्या मसाला ऑम्लेटला खवैयांची पसंती मिळते. ‘डेझर्ट’प्रेमींकडून डार्क चॉकलेट पेस्ट्री, ब्लूबेरी चीझ केक आणि ‘साकटाट’ या ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या डेझर्टला मागणी आहे. अॅप्रिकॉट जॅम वापरलेला ‘साकटाट’ आमचे वैशिष्टय़ आहे. ‘चिकन आ-ल-किव’ आणि ‘चिकन पार्मिजियानो’ या वेगळ्या पदार्थानाही पसंती मिळू लागली आहे.’’

सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष!

कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीप्रमाणेच विधी महाविद्यालयाजवळील जर्मन बेकरीतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शिवाय प्रवेशद्वारावर ‘मेटल डिटेक्टर’ बसवण्यात आला असून ग्राहकांच्या हातातील पिशव्यांची तपासणीही केली जाते.