कर्जमाफी ही सुरूवात असून राज्यातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती द्यायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतीपूरक उद्योगांवर भर देण्यात येणार आहे. पशू संवर्धन विभागाकडून काही योजना केंद्राकडे पाठविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी सरकार मदत करणार असून त्याबाबतचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात बापट बोलत होते. जिल्ह्य़ातील प्रातिनिधिक स्वरुपात पात्र पंचवीस शेतकऱ्यांचा कर्जमाफी प्रमाणपत्र, सन्मानपत्र, साडी-चोळी, दिवाळी फराळ देऊन बापट यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार बाबुराव पाचर्णे, जगदीश मुळीक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले,‘ निसर्गाच्या लहरीपणावर शेती आणि पिके अवलंबून असतात. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतीपूरक उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले परिणाम राज्यभर दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत.  जिल्ह्य़ातून २ लाख ९८ हजार ५६ लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना साडे पाचशे कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. योजनची ही सुरूवात असल्याने यादीत नाव नसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पात्र असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.’

‘यंदा कर्जमाफीमध्ये अपात्र लोकांना लाभ घेता येणार नाही. त्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ जाणार असून गरप्रकार होऊ नये यासाठी शासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांवरील मोठा बोजा कमी होणार आहे’, असे दळवी यांनी सांगितले.