पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू स्टेडियम येथे नियमांचे उल्लंघन करून क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा घाट सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही स्पर्धेसाठी मैदान देता येत नाही, याची स्पष्ट कल्पना मैदानासाठी नेमलेल्या ‘क्युरेटर’ने संबंधितांना दिलेली असताना आणि महापालिकेने स्पर्धेला अद्यापही परवानगी दिलेली नसताना स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने होणारी ‘नामदार चषक’ क्रिकेट स्पर्धा वादात सापडण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्ष कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने अठरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नामदार चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सोळा संघ सहभागी झाले असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू स्टेडियम येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र त्यानंतरही स्पर्धेच्या आयोजनाचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी नेहरू स्टेडियमच्या व्यवस्थापकांवरही दबाव टाकण्यात येत आहे.

नेहरू स्टेडियमवर स्पर्धा घेण्यासंदर्भात काही ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने केले आहेत. त्यानुसार पावसाळ्याच्या कालावधीत म्हणजे एक जून ते एक ऑक्टोबर या कालावधीत मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. मैदानावर सामने घ्यायचे झाल्यास क्युरेटरची परवानगी घ्यावी लागते. तसेच लेदर चेंडूवरच सामने घेणे बंधनकारक असून स्टेडियम हवे असल्यास किमान पंधरा ते वीस दिवस आधी महापालिकेकडे रितसर परवानगी अर्ज करावा लागतो. मात्र या नियमांना फाटा देत ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या नियमांबाबतची कल्पनाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मैदानावर गवत वाढले असून खेळपट्टीही तयार झालेली नाही. त्यामुळे सामने भरविता येणार नाहीत, असे क्युरेटरकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही स्पर्धेसाठी व्यवस्थापकांवर दबाव आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मैदानाची मागणी करण्यात आली असून महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर आयोजकांना मैदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे नेहरू स्टेडियममधील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पावसाळ्याच्या कालावधीत नेहरू स्टेडियम सामन्यांसाठी दिले जात नाही. मात्र महापालिकेत सत्ता असल्यामुळे पालकमंत्र्यांच्या नावाने होणारी ही स्पर्धा नियमांना बगल देत आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांवर दबावही टाकण्यात येत आहे, असे प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितले.