न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत शहरातील गणेश मंडळे शिस्तबद्ध पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करतील, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाच्या देखाव्याच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, माणिकराव चव्हाण, महेश सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, की भारतीय समाजामध्ये उत्सवांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे देशात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत अत्यंत धार्मिकतेचे आणि उत्साहाचे वातावरण असते. पुण्यातही यंदाचाही उत्सव तितक्याच मांगल्यमय वातावरण पार पडेल. सर्वोच्च न्यायालयाने उत्सवाच्या ध्वनिक्षेपकाबाबत काही नियम घातले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावता येतो. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणेही आवश्यक आहे. गणेश मंडळे या नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव नक्की साजरा करतील, हा माझा विश्वास आहे. उत्सवाच्या काळात मंडळांकडून रक्तदान, आरोग्य शिबिरे असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. मंडळे ही समाजाशी एकरूप झालेली आहेत. त्यामुळेच सामाजिक एकोपाही निर्माण होण्यास मदत होत आहे. यंदा होणाऱ्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाकडून ब्रह्मस्पती मंदिराचा देखावा उभारण्यात येणार आहे. गणपती संदर्भातील सर्व शुभचिन्हांचा या मंदिरात वापर करण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे या देखाव्यालाही भाविकांचा प्रतिसाद मिळेल, असे त्यांनी सांगितले.