सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या आश्वासनांची पूर्ती गेल्या पाच वर्षात केली नाही. पुणे अनेक समस्यांनी ग्रस्त आहे तेव्हा येथील ‘कारभारी बदला’ आणि भारतीय जनता पक्षाला निवडून द्या असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज संपला. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि राज्यसभा खासदार संजय काकडे हे उपस्थित होते.  शहराचा पाण्याचा आणि कचरा प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी पक्षाला अपयश आले आहे.

त्यांना पुणेकर जनतेने महापालिकेमध्ये एवढी वर्ष सत्ता दिली असताना त्यांनी विकास केला नाही. त्याचे योग्य नियोजन केले नाही. यामुळे सर्व प्रश्न जैसे थे आहेत.  ६ टीएमसी मैलापाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे होते. ते देखील त्यांना १०० टक्के करता आले नाही. एकही प्रकल्प यशस्वीरित्या राबविता आला नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर त्यांनी टीका केली. तसेच येणाऱ्या कालावधीत भाजपची महापालिकेत सत्ता आल्यावर मेट्रोचे जाळे विस्तारण्यावर अधिक भर राहणार असून २४ तास समान पाणी पुरवठा कसा देतील येईल यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.