पाटबंधारे खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारने आवश्यक तिथे चौकशी केली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी आणि निलंबन करत राहिलो तर हे निलंबन खाते होईल, अशी टिप्पणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
खडकवासला प्रकल्पाच्या जुना मुठा कालव्याचे नूतनीकरण हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाटबंधारे (जलसंपदा) विभाग बदनाम झाला आहे. त्यामुळेच मागचे सरकार गेले. हा विभाग मूठभर ठेकेदारांच्या हातात गेला होता. त्यामुळेच आताच्या सरकारने आधीची ७००-८०० कोटी रुपयांची कामे रद्द केली आहेत. आता या विभागात पारदर्शक कारभार आला आहे, असे महाजन यांनी सांगितले.