जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या युवतींची मागणी

मराठा क्रांती मोर्चा रविवारी दुपारी विधानभवन परिसरात पोहोचल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवतींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. कोपर्डीसारख्या घटना घडू नयेत, ही दुर्दैवी घटना पहिली व शेवटची असावी, निवेदनात दिलेल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि मागण्यांबाबत चर्चा नको कृती करा, असे या युवतींनी राव यांना सांगितले.

मेधा कुरुमकर, नुपूर दरेकर, करिष्मा पारधी, विशाखा भालेराव आणि सानिया तापकीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या युवतींनी विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. कोपर्डीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या कायद्यात बदल करावा यासह नऊ मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, आपल्या अनेक मागण्यांवर शासनाने या आधीच कार्यवाही सुरू केली असून अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. परंतु काही मागण्या कायद्याच्या चौकटीतील असल्याने कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे आपल्याला पुढे जावे लागेल. शासनाला आपल्या मागण्यांबाबतची माहिती या आधीच मिळालेली आहे. तरी मी माझ्याकडून देखील आपले निवेदन सरकापर्यंत पोहोचवेन.

मोर्चातील प्रमुख मागण्या

  • कोपर्डी घटनेसह महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या
  • अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करा
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती आणि शेतमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव द्या
  • मराठा समाजाला आरक्षण, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख करा
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे उच्च शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगार कार्यरत करा
  • अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे