नाटय़, नृत्य, गायन, वादन आणि नाटय़छटा अशा विविध प्रकारातील १३५० कार्यक्रम.. देशाच्या २० राज्यांतील सहा हजारांहून अधिक कलाकारांचा सहभाग.. नव्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देणारा ‘ग्लोबल हार्मनी २०१५’ हा अखिल भारतीय बहुभाषिक नृत्य, नाटय़, संगीत महोत्सव गुरुवारपासून (२१ मे) १२ दिवस रंगणार आहे.
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर, संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिकशास्त्र आणि सांस्कृतिक संस्था (युनेस्को) यांच्यातर्फे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन सातारा येथील श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे गुरुवारी दुपारी बारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास स्पेन येथील प्रसिद्ध बेली नृत्यांगना इल्हाम, ज्येष्ठ कथक नृत्यांगना केया चंदा मुखर्जी, बंजारा फिल्म अकादमीचे संस्थापक गिरिराज जेमिनी, ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना कांचन ललिता, प्रसिद्ध सतारवादक सुब्रतो डे, विजया काळे, उज्ज्वला नगरकर, स्नेहा पेठकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. हे मान्यवर विविध स्पर्धाचे परीक्षक म्हणूनही काम पाहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ आणि श्याम भुर्के यांनी दिली.
या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील विविध कलाप्रकाराच्या कलाकारांमध्ये वैचारिक देवाण-घेवाण होत असून नव्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या महोत्सवाचे यंदा ११ वे वर्ष असून महोत्सवातील कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर आणि पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे १ जून रोजी सकाळी अकरा वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असून त्यास केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा आणि राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे उपस्थित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे रत्ना वाघ यांनी सांगितले.