साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला गेलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून सोनेखरेदीचा अक्षय्य उत्साह सोमवारी सराफ बाजारपेठेने अनुभवला. सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने वेढण्यांच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांना मागणी अधिक होती. ही बाब ध्यानात घेऊन सोमवार असूनही सराफी बाजारपेठ ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली होती.
बंदचे आंदोलन मागे घेतल्यानंतर अक्षय्य तृतीया हा पहिलाच मोठा मुहूर्त आल्यामुळे सोमवारी मोठय़ा प्रमाणावर सोनेखरेदी झाली. अक्षय्य तृतीया हा मुहूर्त साधून पूर्वी सोन्याची वेढणी किंवा तोळ्याच्या स्वरूपात खरेदी केली जात असे. मात्र, लग्नसराईचा मोसम अजून सुरू असल्याने यंदा दागिने खरेदीकडे कल दिसून आला, अशी माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अजित गाडगीळ यांनी दिली.
दिवसभर उन्हाच्या कडाक्यामुळे दुकानांमध्ये फारशी गर्दी नव्हती. दुपारनंतर आभाळ भरून आले आणि पाऊस पडून सोनेखरेदीचा मुहूर्त चुकतो अशी परिस्थिती झाली होती. मात्र, पावसाची एक छोटीशी सर येऊन गेल्यानंतर सायंकाळपासून सराफ बाजारपेठेमध्ये नागरिकांनी सोनेखरेदीसाठी गर्दी केली होती. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठय़ा आणि पेंडंट यांनाही चांगली मागणी होती. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कमी झाला नव्हता. ऑनलाईन बाजारपेठ खुली असली तरी सराफांकडे जाऊनच सोनेखरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्याची प्रचिती अक्षय्य तृतीयेला आली, असेही गाडगीळ यांनी सांगितले.