‘येत्या काळात सर्व जगाच्याच भारताकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. आपल्याला नोकरीसाठी चांगली पात्रता असलेले उमेदवार नकोत, तर नोकऱ्या तयार करणारे उद्योजक हवे आहेत. याची जाणीव सर्व क्षेत्रांतून कायम ठेवली पाहिजे,’ असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी व्यक्त केले.
‘आविष्कार’ या आंतरविद्यापीठीय संशोधन प्रकल्पांच्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात राव बोलत होते. या वेळी पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी उपस्थित होते. भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, शेत आणि पशुविज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषधनिर्माणशास्त्र अशा सहा गटांत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहाशे प्रकल्प आहेत. राज्यातील २० विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रकल्पांचीही राव यांनी पाहणी केली.
या वेळी राज्यपाल म्हणाले, ‘भारत हा एके काळी तत्त्वज्ञान आणि विज्ञानातही अग्रेसर होता. भारताची शैक्षणिक क्षेत्रातील मक्तेदारी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात सर्व जगाच्याच भारताकडून अपेक्षा आहेत. आपल्याला नोकऱ्या निर्माण करणाऱ्यांची गरज आहे. आता उद्योग सुरू करण्यासाठी घरच्या पाश्र्वभूमीची गरज नाही. आवश्यकता आहे ती कल्पकतेची. विद्यार्थ्यांनी सतत नावीन्याचा शोध घेतला पाहिजे.’
या वेळी डॉ. देशपांडे म्हणाले, ‘संशोधनाकडे छंद म्हणून पाहू नका, ती एक जबाबदारी आहे. एकूण लोकसंख्येपैकी किमान एक टक्का लोकांनी संशोधन क्षेत्रात असणे गरजेचे आहे. त्याचवेळी संशोधनाच्या गुणवत्तेकडेही लक्ष दिले पाहिजे.’
भारतीय जैन संघटनेतील विद्यार्थ्यांना राजभवनावर आमंत्रण
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारतीय जैन संघटना या संस्थेलाही भेट दिली. भारतीय जैन संघटनेने आत्महत्या केलेल्या शेतक ऱ्यांच्या मुलांना दत्तक घेतले असून साधारण तीनशे मुले या संस्थेत आहेत. या शिवाय साधारण ३१२ आदिवासी विद्यार्थ्यांनाही संस्थेने दत्तक घेतले आहे. या मुलांशी संवाद साधून राज्यपालांनी त्यांना राजभवन येथे स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी समारंभालाही राव उपस्थित होते. ‘देशात उच्चशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले. मात्र गुणवत्तेकडे लक्ष देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता रोजगारक्षम बनवणे आवश्यक आहे,’ असे मत राव यांनी या वेळी व्यक्त केले.