शनिशिंगणापूर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. घटनेतील तत्त्वांची आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यामध्ये सरकारला अपयश आले. केवळ पुरुषांनी झुंडशाहीने प्रवेश केला म्हणून बायकांना प्रवेश खुला करावा लागला हे वास्तव आहे. या साऱ्या प्रकारामुळे महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत जे काही सुरू आहे त्याने मी अस्वस्थ आणि असमाधानी आहे, असे मनोगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
शनिशिंगणापूर येथे महिलांना दर्शनासाठी प्रवेश मिळावा यासाठी विद्या बाळ यांनी याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने महिलांना मंदिरामध्ये दर्शन घेता येईल असा निकाल दिला होता. ‘मंदिर प्रवेश झाला आता पुढे काय?’, असे विचारले असता विद्या बाळ म्हणाल्या, की खरेतर याचिकेचा निकाल लागला तेव्हाच जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन महिलांचा मंदिर प्रवेश सुकर कसा होईल याची दक्षता सरकारने घ्यायला हवी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. निकाल लागल्यानंतर महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा धसका विश्वस्तांनी घेतला का? की हे लोक खेळ खेळत आहेत, असे प्रश्न उपस्थित झाले. दर्शनासाठी महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दंड आकारण्याची शिक्षा कायद्यामध्येच नमूद आहे. याचिकेचा निकाल लागण्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक पत्र लिहून घटनेची अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली होती, मात्र त्यांनी त्याची पोच देखील दिली नाही.
याचिकेचा निकाल आणि आंदोलनाचा परिपाक म्हणून आता महिलांना मंदिर प्रवेश मिळाला असेल तर त्याचे श्रेय कशाला घेता असा प्रश्न उपस्थित होतो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी घटना पाठवतो असे सांगितले आणि त्यांनी घटना पाठवलीच नाही, मात्र दबाव आल्यानंतर विश्वस्तांनी आधी पुरुषांना दर्शनासाठी होकार दिला असला तरी महिलांना नाही असाच सूर कायम ठेवला आहे, याकडेही बाळ यांनी लक्ष वेधले.
घटनेने स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही समान हक्क दिले असताना महिलांना दुय्यम स्थान का दिले जाते, असा सवालही त्यांनी केला. मासिक पाळी येत असल्याने स्त्री अपवित्र कशी होते. स्त्रीला पाळी येते म्हणूनच हे जग चालले आहे. देवानेच हे शरीर निर्माण केले आहे हे वैज्ञानिक सत्य धार्मिक नेते स्वीकारणार आहेत की नाही, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
मी व्यक्तिश: देव मानत नसले तरी सामाजिक कामामध्ये आत्मकेंद्री असणे बेजबाबदारपणाचे वाटते. त्यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सन २००० मध्ये सुरू केलेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनामध्ये मी सहभागी झाले होते. घटनेला नाकारणारे धार्मिक गुरू कोण असे विचारून हा विषय धसाला लावावाच लागेल. ती माझी जबाबदारी आहे असे मानते. म्हणूनच मी हे काम केले असेही विद्या बाळ यांनी स्पष्ट केले.