कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात कामगारांनी बुधवारी देशभर पुकारलेल्या संपामुळे पुण्यातील बहुसंख्य शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. पुण्यातून या संपात सुमारे दोन ते अडीच लाख कामगार सहभागी झाले होते. कामगार संघटनांनी संपानिमित्त रस्त्यावर उतरून मोठय़ा संख्येने मोर्चे काढले आणि आपला निषेध व्यक्त केला. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
चाकण, शिरूर, शिक्रापूर, बारामती आणि जिल्ह्य़ातील सुमारे ५८० कारखान्यांसह संरक्षण क्षेत्र, घरकामगार, शासनाच्या योजनांमधील कर्मचारी, बिडी कामगार, माथाडी कामगार, चतुर्थ क्षेणी पालिका कर्मचारी आणि कंत्राटी कामगार संपात सहभागी झाल्याची माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘इंटक’, ‘आयटक’, भारतीय मजदूर संघ, ‘सिटू’, हिंद मजदूर सभा, ‘माथाडी आणि जनरल कामगार संघटना’, ‘एनएफआयटीयू’, टाटा मोटर्स आणि इतरही कामगार संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. इंटकचे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष कैलास कदम, ‘सीटू’चे अजित अभ्यंकर, ‘आयटक’चे माधव रोहम, ‘एनएफआयटीयू’चे म. वि. अकोलकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.
संपामुळे दिवसभर बहुसंख्य शासकीय आणि खासगी कार्यालये ओस पडली होती. मोठय़ा कंपन्यांमधील कामगारही संपात सहभागी होते. अंगणवाडी, माध्यान्ह भोजन योजना, आशा कर्मचारी अशा शासकीय योजनांमधील कर्मचाऱ्यांनीही संपाला पाठिंबा दिला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या परिचारिकाही संपात सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्ष अनुराधा आठवले यांनी दिली. पुणे महापालिका कामगार युनियनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पालिकेतील हजारो कामगार संपात सहभागी झाले होते. पालिका भवनाबाहेर झालेल्या सभेत संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर तसेच उदय भट, मेधा थत्ते यांची भाषणे झाली.
कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मांडलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करण्याचे शासनाने ठरवले असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाने या संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीने पिंपरीत रास्ता रोको आंदोलन केले, तसेच कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे दुचाकींची फेरी काढण्यात आली. चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे आणि शहरातील कामगार त्यात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत श्रमिक आघाडीने अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. संत तुकारामनगर येथून सुरू झालेल्या निषेध रॅलीचा समारोप पिंपरीत सभेने झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाजूला केले. पिंपरी पालिका कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार पालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. िपपरी शहर काँग्रेसने कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते.