पुणे-मुंबई या शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न नाही. पण, मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांत नोव्हेंबरमध्येच पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. काही ठिकाणी चार दिवसांनी, काही ठिकाणी आठवडय़ातून तर लातूर आणि मनमाड येथे २०-२२ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. ही परिस्थिती आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ पाल्यांचे पूर्ण शैक्षणिक पुनर्वसन करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे शनिवारी वाघोली येथील संस्थेमध्ये पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद या वेळी उपस्थित होते.
लातूरमधील किल्लारी येथे २२ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या आठवणींना उजाळा देत पवार म्हणाले, त्या वेळी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले. भूकंपामध्ये सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी शांतिलाल मुथ्था पुढे आले. त्या वेळची मुले आता पदवीधर झाली असून आपल्या पायावर उभी आहेत. गुजरातमध्ये भूज येथे भूकंप झाला. तेव्हा पंतप्रधान वाजपेयी यांनी मला बोलावून घेतले. त्याही वेळेस मुथ्था यांनी तेथील मुलांना पुण्यामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. नैसर्गिक आपत्तीनंतर पुनर्वसनासंदर्भात धोरण आणि कायदा करण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले होते. सरकारचे धोरण असते. पण, समाजाचा हातभार लागल्याखेरीज ते यशस्वी होऊ शकत नाही. अंदमान येथील भूकंपानंतर मी गेलो होतो. तेथेही मुथ्था आलेच होते. आपत्ती आल्यानंतर पक्षभेद विसरून मजबुतीने उभे राहणे ही देशाची संस्कृती आहे. संकटांशी मुथ्था यांचे नाते जोडले गेले आहे आणि दुर्दैवाने माझेही जोडले गेले आहे.
बापट म्हणाले, आत्महत्यागस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मुथ्था यांनी मोठे जग दाखविले आहे. संकटावर मात कशी करायची हे येथे शिकता येणार आहे. सरकारच्या मदतीला काही मर्यादा असतात. उपकाराच्या भावनेतून केलेल्या मदतीपेक्षा कर्तव्याच्या भावनेतून केलेली मदत महत्त्वाची असते हे मुथ्था यांनी सिद्ध केले आहे.
भापकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुथ्था यांनी प्रास्ताविकामध्ये भविष्यात आणखी मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाची जबाबदारी संस्था घेणार आहे, असे सांगितले.
केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळवू
दुष्काळाची पाहणी करण्यास गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काही ठिकाणी शेतकरी राग व्यक्त होत आहे. तो स्वाभाविकही आहे. पण, अधिकाऱ्यांचा काही दोष नाही हे ध्यानात घ्यायला हवे, असे सांगून शरद पवार म्हणाले, सध्या पाण्याची स्थिती गंभीर असून फळबागा टिकविणे अवघड झाले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील सारे खासदार केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करू.