बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे आता ‘स्वच्छ भारत’च्या धर्तीवर लोकसहभागातून ‘हरित भारत’ साकारेल, असे प्रतिपादन केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
एन. आय. बी. एम. रस्त्यावरील आनंदवन नागरी वनउद्यान विकासकामाचा शुभारंभ जावडेकर यांच्या हस्ते झाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार योगेश टिळेकर, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर या वेळी उपस्थित होते. ताम्हिणी अभयारण्याच्या माहिती घडीपत्रकाचे अनावरण या वेळी जावडेकर यांच्या हस्ते झाले.
जावडेकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली कार्बनचे बेसुमार उत्सर्जन केले आहे. त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. निसर्गाचा हा समतोल साधण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही. जगातील इतर सर्व शहरांत जंगले आहेत. मात्र, दुर्दैवाने भारतात शहरातील जंगलांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आनंदवनच्या धर्तीवर सर्व शहरांत जंगलांची लागवड करणे आवश्यक आहे. पुणे शहरातील सर्व डोंगर-टेकडय़ांवर मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड करून जंगले वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक शहरात जंगल विकसित करण्यासाठी वनांच्या जमिनींना केंद्राच्या निधीतून संरक्षण भिंती बांधून देणार आहे.