पालकमंत्री गिरीश बापट यांची टीका

महापालिकेत पंधरा वर्षे सत्ता भोगूनही पुणेकरांसाठी समान पाणीपुरवठा योजना सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली नाही. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेले पाण्याच्या टाक्यांचे भूमिपूजन हा केवळ दिखाऊपणा होता. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला चोवीस तास समान पाणीपुरवठा योजना पार पाडायचीच नव्हती. आता मात्र, या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी केली.

पुणेकरांना चोवीस तास समान पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात १२३ पाण्याच्या साठवण टाक्या उभारल्या जाणार आहेत. स्वारगेट, मार्केट यार्ड परिसरातील साठवण टाक्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री बापट बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक हेमंत रासने, सम्राट थोरात, अजय खेडेकर यावेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, महापालिका निवडणुकीपूर्वी पुणेकरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. त्यानुसार समान पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. या योजनेचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.

भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी

समान पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी सोळा ठिकाणी करण्यात आले होते. त्यापैकी वडगाव शेरी-खराडी भागातील साठवण टाकीच्या कामाचे भूमिपूजन महापौर मुक्ता टिळक आणि आमदार जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याच कामाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या मुद्यावरून तसेच अजित पवार यांचे नाव असलेली भूमिपूजनाची कोनशिला काढल्याबद्दल राष्ट्रवादीच्या संतप्त नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव यांना धक्काबुक्की करण्यात आली.