वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने प्रेमसंबंध तुटल्याच्या कारणावरून त्याच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या मैत्रिणीचा खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तरुणाला गजाआड केले आहे.

श्रेयांश दीपक चोपडा (वय २२, सध्या रा. आनंद स्मृती, चंद्रभागानगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात एकवीस वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मूळची हरियाणाची आहे. तर आरोपी श्रेयांश  चोपडा हा मूळचा छत्तीसगडचा आहे. कात्रज येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात दोघे तिसऱ्या वर्षांत शिक्षण घेत आहेत.

श्रेयांश आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी तरुणीने त्याच्या सोबत असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. त्यामुळे श्रेयांश तिच्यावर चिडून होता.

त्याने तरुणीला पाच मे रोजी घरी बोलावून घेतले आणि तिला मारहाण केली. तरुणीचे तोंड पाण्यात बुडवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले.

घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर श्रेयांश याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस.जे.कदम तपास करत आहेत.