१० रुपयांच्या चिक्कीमध्ये अळी सापडल्याने १० हजारांचा दंड

शेंगदाणा चिक्कीच्या सीलबंद पाकिटामध्ये अळी आढळल्याचे सिद्ध झाल्यामुळे नागपूरच्या हल्दीराम फूड इंटरनॅशनल कंपनीला दहा हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि यशदाचे माहिती अधिकार प्रशिक्षक महेंद्र दलालकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दलालकर यांनी १५ सप्टेंबर २०१३ रोजी वारजे येथील एका दुकानातून १० रुपये किमतीची ५० ग्रॅम वजनाची हल्दीरामची पिनट चिक्कीबार घेतली. घरी गेल्यानंतर ती उघडण्यासाठी हाताळत असताना त्यामध्ये जिवंत अळी आढळून आली. त्यामुळे दलालकर यांनी विक्रेत्याकडे संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दलालकर यांनी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे ती चिक्की तपासणीसाठी दिली. अन्न आणि सुरक्षा मानके कायदा २००६ मधील कलमानुसार ही चिक्की खाण्यास असुरक्षित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला.

या अहवालाच्या आधारे दलालकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्यान्वये जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी दलालकर यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आणि चिक्कीमुळे परिवाराचे स्वास्थ्य बिघडले असते हा शासनाच्या प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य़ धरून हल्दीराम कंपनीला दहा हजार रुपये भरपाईचे आदेश दिले. दलालकर यांनी हल्दीराम व्यवस्थापनाविरुद्ध तीन वर्षे न्यायालयीन लढा दिला.