अर्थमंत्री हसीब द्रबू यांचे आवाहन

जम्मू आणि काश्मीरचे दररोज भाषिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय आणि आर्थिक नुकसान होत आहे. भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना लोकशाही आणि वैविध्य जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. जम्मू-काश्मीरला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सरकारपेक्षा सामान्य नागरिकांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरची ओळख बदलण्यापेक्षा आम्हाला आहे तसे स्वीकारा, असे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे अर्थमंत्री हसीब द्रबू यांनी रविवारी केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त द्रबू यांनी ‘जम्मू आणि काश्मीरची प्रगती’ या विषयावर संवाद साधला. सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर आणि संचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.

द्रबू म्हणाले, ‘गेल्या ७० वर्षांत देशामध्ये जे काही घडले, तेच पुढे कायम ठेवायचे की त्यामध्ये बदल करायचा, प्रश्न आहे. काश्मीरची स्वतंत्र वेगळी घटना, स्वतंत्र ध्वज, पंतप्रधान असावेत, अशी मागणी झाली होती. मधल्या काळात अध्यक्षांची जागा राज्यपाल यांनी आणि पंतप्रधानांची जागा मुख्यमंत्र्यांनी घेतली. काश्मीरला घटनेचा काही भाग लागू झाला. काश्मीर भारताचा एक भाग होत असताना ते सार्वभौमत्वाचा आदर्श होऊ शकते का, याचा विचार करण्यात आला. एकात्मतेची ही प्रक्रिया वादग्रस्त आणि शंकास्पद आहे. अशा परिस्थितीत जम्मू आणि काश्मीर सक्षम संघराज्य होऊ शकते का, याचा विचार व्हायला हवा.

जम्मू-काश्मीरमधील संस्कृती, जमीन सुधारणा या जमेच्या बाजूंची भारतीय लेखकांनी नोंद घेतली नाही. मात्र, परदेशी अभ्यासकांनी याची आवर्जून नोंद घेत त्याबद्दल भरभरून लिहिले. जम्मू-काश्मीरचे योगदान कायम दुर्लक्षित राहिले. हस्तकला, फलोत्पादन या क्षेत्रामध्ये सक्षम असल्याने राज्यातील उद्योग ५ हजार कोटी रुपयांवरून ४० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे सांगून द्रबू म्हणाले, काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर घालू शकतो. वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरची विधानसभा सर्वात सक्षम ठरली आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजपची युती झाली तेव्हा अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र, आता बऱ्यापकी आत्मविश्वास आला आहे. काश्मीरच्या प्रगतीच्यादृष्टीने भाजपने एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. माशेलकर यांनी प्रास्ताविकामध्ये काश्मीरसंदर्भात मूलभूत काम केलेले दिलीप पाडगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. केळकर यांनी द्रबू यांचा परिचय करून दिला.