पुणे शहराच्या बहुतांश भागात शनिवारी दुपारी वादळी पावसाच्या सरी बरसल्या. या पावसाची सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.६ मिलिमीटर इतकी नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारीसुद्धा वादळी पावसाच्या मोठय़ा सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात शुक्रवारपासूनच अंशत: ढगाळ वातावरण कायम होते. त्याचा परिणाम म्हणून हवेत उष्मा जाणवत होता. शनिवारीसुद्धा पुण्यात असेच वातावरण होते. सकाळच्या उष्म्यानंतर दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींना सुरुवात झाली.
सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. त्यानंतरही काही काळ हलक्या सरी पडतच होत्या. या पावसामुळे सायंकाळच्या वेळी मात्र हवेत गारवा निर्माण झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.