खडकवासला धरणातून विसर्गाला सुरुवात; जिल्ह्य़ातील चौदा धरणे शंभर टक्के भरली

राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम असताना पुण्यातही मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या चार दिवसांपासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरु झालेल्या पावसाची रात्री अकरा वाजेपर्यंत २५.३ मिलिमीटर एवढी नोंद हवामान विभागाने केली. दरम्यान, धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्य़ातील १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह पानशेत आणि वरसगाव ही धरणे शंभर टक्के भरल्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात सुमारे दोन हजार ५६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग चार हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

राज्यातील अनेक भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. शहरात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली. दुपारपासून पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर सायंकाळी व रात्री उशिरापर्यंतही पावसाचा जोर कमी झाला नव्हता. पुढील दोन दिवसही असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि परिसरातील वाहतूक धिम्यागतीने

सुरु होती. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरु नसल्याने पुणेकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्राचे मांडव जागोजागी उभे केल्याने आणि अद्यापही गणेशोत्सवातील मिरवणूक रथ रस्त्यांवरच असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे पूर्ण भरली आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.

शहर आणि परिसरात जिल्ह्य़ातील प्रमुख १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामध्ये खडकवासला, वरसगाव, पानशेत, वडज, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, निरा देवघर, भाटघर आणि वीर यांचा समावेश आहे. दिवसभरात टेमघर धरण क्षेत्रात ३८ मिलिमीटर, वरसगाव परिसरात ३२ मिलिमीटर, पानशेत धरण भागात ३३ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नीरा देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण जास्त आहे. वीर धरणातून दिवसभरात सुमारे पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. उजनी धरण क्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या धरणातून दिवसभरात सुमारे १४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

* शहरात मंगळवारी सकाळी साडेआठपासून रात्री अकरापर्यंत २५.३ मिलिमीटर पाऊस

* दिवसभरातील मुसळधार पावसाने वाहतूक संथ गतीने.

* अनेक भागात पाणी साठल्याने वाहनचालकांची तारांबळ.

* पावसामुळे अनेक रस्त्यांवर तात्पुरती डागडुजी केलेल्या खड्डय़ांमधील खडी बाहेर.

* सातारा, सिंहगड, कर्वे, गणेश खिंड, शिवाजी, बाजीराव अशा मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी ‘पिकअवर’मध्ये वाहनांच्या रांगा.

धरण               पाणीसाठा                       (टीएमसी)    टक्क्य़ांमध्ये

उजनी                  ५७.९०                           १०८.०८

पानशेत                १०.६५                          १००

पवना                    ८.५१                           १००

खडकवासला         १.९७                           १००

वरसगाव              १२.८२                         १००

भाटघर                  २३.५०                      १००

वीर                        ९.४१                       १००

निरा देवघर           ११.७३                     १००

कासारसाई             ०.५७                      १००

कळमोडी                १.५१                      १००

चासकमान              ७.५७                    १००

आंद्रा                       २.९२                    १००

वडिवळे                   १.०७                    १००

भामा आसखेड         ७.६७                   १००

डिंभे                        १२.१७                 ९७.४५

टेमघर                      २.०४                  ५५.००