जिल्ह्य़ाच्या भागात अजूनही जोराच्या पावसाची प्रतीक्षा

अनेक दिवसांनंतर रविवारी पुणेकरांनी संततधार पावसाचा अनुभव घेतला. शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही विश्रांती न घेता सातत्याने पडत राहिला. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही काही भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात अडोतीस ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.

जिल्ह्य़ात बारामती, इंदापूर आणि दौंड भागात दोन महिन्यांपासून म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. येथे अनेक ठिकाणी जमिनीत ओलावा निर्माण करेल असा ‘मूर’ पाऊस झाला आहे. मोठय़ा पावसाची मात्र जिल्ह्य़ाच्या अनेक भागांत अद्याप प्रतीक्षा आहे.

रविवार, पावसाची संततधार आणि त्यातच संध्याकाळी भारत-श्रीलंका क्रिकेट सामना असे समीकरण जुळून आल्यामुळे पुणेकरांनी संध्याकाळीही घराबाहेर न पडणेच पसंत केले. त्यामुळे एरवी रविवारी संध्याकाळी वाहनाच्या गर्दीने खचाखच भरून जाणाऱ्या रस्त्यांवरही वर्दळ कमी होती. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या (आयएमडी) नोंदीनुसार पुण्यात रविवारी संध्याकाळी साडेआठपर्यंत ४४.२ मिमी पावसाची नोंद झाली. लोहगाव येथेही ५० मिमी पाऊस नोंदला गेला. शनिवारी सकाळपासूनच पुण्यात अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावत होत्या. रात्रीपासून मात्र सातत्याने पाऊस पडण्यास सुरुवात झाली आणि रविवारीही दिवसभर तो सुरूच राहिला. पिंपरी-चिंचवडमध्येही तब्बल महिनाभर दडी मारल्यानंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पावसामुळे शहरातील रस्त्याच्या सखल भागामध्ये पाणी साचले, तसेच रस्त्यामधील खड्डय़ांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती.

शहर परिसरात कर्वेनगर, कोथरूड, औंध, बोपोडी, कल्याणीनगर, येरवडय़ासह शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे पडली. अग्निशमन दलाकडून रस्त्यात पडलेली झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. झाडे पडण्याच्या घटनेमुळे मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग

लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण १०० टक्के भरल्यामुळे धरणातून रविवारी ३६८० क्यूसेकने पवना नदीत पाणी सोडण्यात आले. लोणावळ्यात दोन दिवस सलग सुरू असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून रविवारी राष्ट्रीय व द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्या पावसामुळे कमालीची घटल्याचे दिसून आले. लोणावळा व मावळ परिसरातील धरणांची संततधार पावसामुळे पातळी वाढली आहे. रविवारी दुपारी एक वाजता पवना धरणाचे चार दरवाजे अर्धा फुटाने उघडत पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. पवना नदी पावसामुळे दुथडी भरून वाहात आहे. त्यातच धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जेजुरीच्या नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५३ मिमी पाऊस

जेजुरी : जेजुरी शहर व परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. कोरडेठाक पडलेल्या नाझरे (मल्हारसागर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५३ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती नाझरे पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ लिपिक विश्वास पवार यांनी दिली. सध्या १२५ क्यूसेकने नदीतून पाणी वाहात असून पावसाची संततधार राहिल्यास धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येण्यास सुरुवात होईल, असे पाटबंधारे शाखा अभियंता एस. सी. चवलंग यांनी सांगितले. धरण कोरडे पडल्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुमारे ५६ गावे व वाडय़ावस्त्यांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला होता. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.