पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्या नंतर बहुतांश नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडूनही त्याला जोरदार विरोध होत असतानाच राज्याच्या परिवहन खात्याने हेल्मेटसक्तीबाबत आणखी एक आदेश काढला आहे. त्यानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीबाबतही हेल्मेटसक्ती राबविण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दुचाकीची विक्री करतानाच त्यासोबत दोन हेल्मेट पुरविण्याचे निर्देश वाहन विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीबाबत भाष्य केल्यानंतर पुणे शहरामध्ये गुरुवारपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. बहुतांश पुणेकरांनी मात्र या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. राजकीय पक्षांनीही या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. दिवाकर रावते हे शिवसेनेचे असतानाही पुण्यात मात्र शिवसेनेनेही त्यांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर परिवहन विभागाने काढलेल्या आदेशानुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्याच्या हेल्मेटसक्तीचीही अंमलबजावणी करणार असल्याचे सांगून हेल्मेटसक्तीत आणखी भर घातली आहे.
मोटार वाहन कायदा व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना देतेवेळी संबंधिताकडून हेल्मेटच्या वापराविषयी बंधपत्र घेतले जाते. न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून आता दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याविषयी निर्देशित करण्यात येत आहे. वाहन नोंदणी प्राधिकाऱ्याने वाहन नोंदणीसाठी त्यांच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रांसोबत दोन हेल्मेट पुरविण्यात आल्याचे नमूद असल्याबाबत खातरजमा करण्यास निर्देशित करण्यात येत आहे, असे परिवहन विभागाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व हेल्मेट न घातल्याने होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दुचाकी वाहनचालकांनी व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने वाहन चालविताना हेल्मेट घालावे, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.