हेल्मेटसक्ती ही सत्तेत आल्यानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्याला सुचलेले शहाणपण आहे. यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात हेच लोक हेल्मेटसक्तीला विरोध करत होते. सध्या सुरू असलेली हेल्मेटसक्ती ही जनतेच्या सुरक्षिततेसाठी नसून ती हेल्मेटउत्पादक कंपनांच्या फायद्यासाठी आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी येथे बोलताना केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कसबा विभागाचे कार्यालय शनिवार पेठेत उघडण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सध्या सुरू असलेल्या हेल्मेटसक्तीवर जोरदार टीका केली. ‘‘पुणे शहरातील रस्ते खोदलेले आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ नाहीत. जेथे पदपथ आहेत ते देखील खोदलेले आहेत. मुळात रस्ते नीट नसताना हेल्मेटसक्ती कशाला,’’ असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की हेल्मेटसक्तीला आमचा विरोध नाही. हेल्मेटच्या वापरामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचतो, हे देखील मान्य आहे. परंतु नागरिकांना रस्ते आणि त्यासंबंधीच्या कोणत्याही सेवा-सुविधा न देता हेल्मेटसक्ती करणे चुकीचे आहे. त्याला आमचा विरोध आहे.
कार्यक्रमात पक्षाचे नेते दीपक पायगुडे, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, अॅड. गणेश सातपुते, रणजित शिरोळे, शहराध्यक्ष हेमंत संभुस, विभाग अध्यक्ष आशिष देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती. मनसेतर्फे कसबा विभागात २० ते २७ फेब्रुवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष देवधर यांनी या वेळी दिली. त्या अनुषंगाने राज ठाकरे म्हणाले, की विविध शाळांमध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या विचारवंतांचे व्याख्यान या निमित्ताने आयोजित करावे.