पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेले ट्रक फोडून त्यातून चोरी करण्याचे प्रकार वाढले असून, त्यात लाखो रुपयांचा माल चोरीला गेला आहे. गेल्या दोन महिन्यांत या रस्त्यावर अशा तीन गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करणारे आणि त्यांचा माल घेणारे यांची टोळी नव्याने सक्रिय झाली असल्याची शक्यता आहे.
पुणे- कोल्हापूर रस्त्यावर कामथडी (ता. भोर, जि. पुणे) येथे रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक फोडून चोरी करण्यात आली. त्यातील मसाल्याचे पदार्थ आणि सुका मेवा असा १० ते १२ लाख रुपये किमतीचा माल चोरटय़ांनी चोरून नेला. याबाबत ‘शहा गुडस् ट्रान्सपोर्ट सव्र्हिस’चे भागीदार संजीव शहा (रा. मुकुंदनगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांच्या ट्रान्सपोर्टचा ट्रक २३ जुलै रोजी रात्री कोल्हापूरकडे जात होता. ट्रकवरील चालक कामथडी येथे राहतो. त्याने महामार्गालगतच घराजवळ हा ट्रक थांबवला होता. त्याने रात्री आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जायला निघाला, तेव्हा ट्रकची ताडपत्री फाडून या ट्रकमधील मसाल्याचे पदार्थ आणि सुका मेवा असा एकूण १० ते १२ लाख रुपये किमतीचा माल चोरून नेण्यात आला होता.
त्याच काळात (२३ जुलैच्या रात्री ते २४ जुलैच्या पहाटे) सातारा जिल्ह्य़ातील उंब्रजजवळ असाच प्रकार घडला. एका चालकाने त्याचा ट्रक रात्री बारा ते पहाटे पाच या काळात एका धाब्याजवळ उभा केला होता. तो फोडून माल चोरटय़ांनी लांबवला.
त्यापूर्वी २ जून रोजी असाच प्रकार कात्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. पुण्याहून कोल्हपूरला जाणारा ट्रक कात्रजजवळील दत्तनगर येथे उभा करण्यात आला होता. तो फोडूत चोरटय़ांनी त्यातील मसाल्याचे पदार्थ आणि सुपारी असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला.
याबाबत संजीव शहा यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत असे प्रकार वाढले आहेत. ट्रकचालक सामान्यत: रात्रीच्या वेळी धाब्यावर किंवा महामार्गाच्या जवळपास आराम करतात. या काळातच सर्व चोऱ्या झाल्या आहेत. त्यात मसाल्याचे पदार्थ आणि विशिष्ट प्रकारचा माल चोरीला जात आहे.
 ‘टोळी सक्रिय असल्याची शक्यता’
‘‘या चोऱ्या करणारी टोळी नव्याने सक्रिय झाली असल्याची शक्यता आहे. चोऱ्या करणारे चोरटे आणि त्यांच्याकडून माल विकत घेणारे व्यापारी यांच्या संगनमताने हे प्रकार होत असावेत. त्यासाठी आम्ही व्यापारी आणि इतर मंडळींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत.’’
– पोलीस निरीक्षक मोहन तलवार, राजगड पोलीस ठाणे, पुणे जिल्हा