तिची काहीही चूक नसताना ती एचआयव्हीबाधित म्हणून जन्मली. आईचे छत्र हरपल्यानंतर आजीने तिला अनाथालयात दाखल केले आणि तेव्हापासून तेच तिचे घर बनले. तिला कधी हक्काचे आई-बाबा मिळतील का, ही काळजी अनाथालयातल्या ताईंच्या मनात राहिलीच. हा नाताळ मात्र या चिमुकलीचे आयुष्य बदलणारा ठरला. कारण नाताळची भेट म्हणून तिला दुसरे तिसरे काही नाही एक प्रेमळ आईच मिळाली आहे..
‘सोफोश’मध्ये (सोसायटी ऑफ फ्रेंडस् ऑफ ससून हॉस्पिटल) राहणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीची ही गोष्ट. ‘सायली’च्या (नाव बदलले आहे) आईने ज्या व्यक्तीवर विश्वास टाकून भविष्याची स्वप्ने पाहिली त्यानेच तिची फसवणूक केली. सायली जन्माला आली ती ‘एचआयव्ही’बाधित मूल म्हणूनच. तिच्या आईच्या मृत्यूनंतर आजीने तिला सोफोशमध्ये दाखल केले. तान्ह्य़ा सायलीची प्रतिकारशक्ती कमी होती. पण सोफोशमधल्या ताईंनी तिला जीव लावला आणि तिची तब्येत सुधारली. असे असले तरी सायली एचआयव्हीबाधित असल्यामुळे तिला दत्तक घ्यायला कुणी तयार होईला का ही काळजी होतीच. पण हा नाताळ सायलीसाठी मोठी भेट घेऊन आला. अमेरिकेतील एका अविवाहित स्त्रीने पुढाकार घेऊन सायलीला दत्तक घेतले.
‘सोफोश’च्या संचालक माधुरी अभ्यंकर व दत्तकविधान समन्वयक संगीता पवार यांनी हे दत्तकविधान करण्यात सहभाग घेतला होता. पवार म्हणाल्या, ‘‘सायलीची नवी आई प्रशिक्षित परिचारिका आहे. त्या स्वत: अविवाहित असून आपल्या आई आणि भावाबरोबर राहतात. यापूर्वी त्यांनी भारतात येऊन एचआयव्हीबाधित मुलांसाठीच्या संस्थेत काम केले आहे. पालक बाळ दत्तक घ्यायचे ठरवतात तेव्हा त्यांना प्राधान्याने कोणताही आजार नसलेले मूल हवे असते. एचआयव्हीबाधित बाळांना दत्तक घेण्यास पालक पटकन तयार होत नाहीतच, पण बाळांच्या पालकांपैकी कुणाला एचआयव्ही असेल आणि बाळ एचआयव्हीमुक्त असेल तरीही त्यांना दत्तक घेण्यास पालक कचरतात. एचआयव्हीबद्दलचा हा ‘सोशल स्टिग्मा’ कमी होणे फार आवश्यक आहे.’’
अकरा वर्षांपूर्वी सोफोशमधून एका एचआयव्हीबाधित मुलाला पालकांनी दत्तक घेतले होते. ते पालक भारतीय होते, असेही पवार यांनी सांगितले.