पूर्वीसारखे कार्यकर्ते राहिले नाहीत.. हे वाक्य सध्या सर्वच पक्षांमध्ये ऐकू येत आहे. प्रसंगी पडेल ते काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षांना चणचण भासत आहे. सध्या आपल्या उमेदवाराची पत्रकं वाटणे, एखाद्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या शोधात पक्षाच्या संघटनेची पावले बाहेरगावहून पुण्यात येऊन वसतिगृहे किंवा पेईंगगेस्ट म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे वळली आहेत.
उमेदवाराच्या प्रचाराची छोटी छोटी कामे करण्यासाठी सध्या पक्षांमध्ये कार्यकर्तेच नाहीत, अशी तक्रार सर्व पक्ष करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या शोधात संघटनांच्या लोकांची पावले आता वसतिगृहांकडे वळू लागली आहेत. बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ही कामे दिली जात आहेत. घरोघरी उमेदवाराची पत्रके देणे, महाविद्यालयांमध्ये पत्रके वाटणे, उमेदवारांच्या स्लीपा देणे, पार्कीगमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ांना पक्षाचे किंवा उमेदवाराचे स्टीकर चिकटवणे अशी कामे या विद्यार्थ्यांना दिली जात आहेत. दिवसाला साधारण पाचशे रुपये, दुपारचे जेवण, पेट्रोल अशा प्रकारचे पॅकेजच या कामांसाठी मुलांना देण्यात येत आहे. विशेषत: पक्षांच्या विद्यार्थी संघटना, युवक संघटनांकडे या कामांसाठी मुले गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तेवढाच महिन्याचा पॉकेटमनी सुटला, या हिशेबाने मुलेही या कामासाठी तयार होत आहेत. सुट्टय़ा लागल्यामुळे वसतिगृहामध्ये राहण्याची परवानगी नसलेल्या एखाद्या कार्यकर्त्यांची मित्राच्या खोलीवर पॅरासाईट म्हणून राहण्याची सोयदेखील केली जात आहे. दिवसभर मुक्कामासाठी पक्ष कार्यालय असतेच. यातील गमतीचा भाग म्हणजे पक्षांचे असे बहुतांश तात्पुरते कार्यकर्ते हे बाहेरगावचे आहेत. त्यामुळे त्यांच्या गावी जाऊन त्यांनी कुणाला मत द्यावे किंवा कोणत्या पक्षाचे काम करावे याचेही बंधन त्यांच्यावर नाही. सध्या पुण्यात वेगवेगळी वसतिगृहे, खासगी खोल्या घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांची पक्षांनी चंगळ केली आहे.