शहरात पाच महिन्यांत ४८७ घरफोडय़ा

शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये घरफ ोडीचे गुन्हे वाढत असून दिवसाढवळ्या सोसायटय़ांमध्ये शिरून चोरटय़ांच्या टोळ्यांकडून सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. गेल्या पाच महिन्यात पुणे शहरात घरफोडीचे ४८७ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले. या गुन्ह्य़ांमध्ये चोरटय़ांनी आठ कोटी ४८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

पुणे शहराच्या विविध भागात असलेल्या सोसायटय़ांची पाहणी करुन अशा सोसायटय़ांमध्ये टापटिप कपडे परिधान केलेले चोरटे शिरतात. चोरटे सोसायटीत शिरताना मोटारीचा वापर करतात. त्यामुळे रखवालदाराला संशय येत नाही. मे महिन्यात चोरटयांनी एरंडवणे परिरात एका रात्रीत सोळा सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. तेथे घरफोडय़ा करुन चोरटे मोटारीतून पसार झाले होते. चोरटय़ांची ही टोळी परराज्यातील असल्याचा पोलिसांना संशय आहे. एरंडवणे परिसरात झालेल्या घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांच्या मागावर पोलीस आहेत. मात्र, अद्याप धागेदोरे मिळालेले नाहीत.

गेल्या काही दिवसात शहरात वाढलेल्या घरफोडीं गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी रात्रगस्त सुरू केली आहे. एरंडवणे, कोथरुड, डेक्कन जिमखाना भागात रात्री पायी गस्त घालण्यात येत आहे. घरफोडय़ा रोखण्यासाठी सोसायटय़ांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रखवालदार नेमण्यात यावा, अनोळखी व्यक्तीला सोसायटय़ांमध्ये प्रवेश देऊ नये, अशा सूचना पोलिसांनी सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी दिल्या आहेत. मात्र, सोसायटय़ांनी पोलिसांच्या सूचनांकडे काणाडोळा केला आहे. बऱ्याच सोसायटय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि रखवालदार देखील नसतो. त्यामुळे चोरटय़ांचे फावते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

यंदा जानेवारी ते मे २०१६ या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ४८७ घरफोडय़ा झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांनी आठ कोटी ४७ लाख ८०१ रुपयांचा ऐवज लांबविला आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये घरफोडय़ा होण्याचे प्रमाण वाढते. अनेक जण सुटय़ांमुळे बाहेरगावी जातात. सोसायटय़ांमधील बंद सदनिकांची पाहणी करून चोरटे कुलूप तोडून घरांमधील ऐवज लंपास करतात. सोसायटय़ांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्यास घरफोडय़ांना आळा घालणे शक्य होईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले.

दिवसाढवळ्याही घरफोडय़ा

गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात यंदा घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. सन २०१५ मध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यात भरदिवसा १२१ आणि रात्री ३८२ घरफोडय़ा झाल्या होत्या. यंदा जानेवारी ते मे अखेपर्यंतच्या काळात भरदिवसा १४७ घरफोडय़ा झाल्या तर रात्री ३४१ घरफोडय़ा झाल्या. हे चोरटे अतिशय चांगला वेश परिधान करून सोसायटय़ांमध्ये जातात, त्यामुळे त्यांचा संशय येत नाही. सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्यांनीही बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना बाहेरगावी जात असल्याची माहिती देणे आवश्यक आहे. दूध आणि वृत्तपत्रे टाकणाऱ्यांनाही बाहेरगावी जाताना सूचना देणे आवश्यक आहे. दूध आणि वृत्तपत्रे सदनिकेच्या दारात पडून रहिल्यास सदनिकेत कोणी नाही हे सहजपणे समजते. अशा सदनिकांची पाहणी चोरटे करत असतात. ही पाहणी करून नंतर अशा सदनिकांमध्ये चोऱ्या केल्या जातात, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.