बारावीचा निकाल यंदा ४.६६ टक्क्यांनी उतरला, गुणांच्या खैरातीला लगाम
बारावीच्या घसघशीत निकालाच्या गेल्या दोन वर्षांच्या प्रथेला यंदा खीळ बसली असून या वर्षी बारावीचा निकाल ८६.६० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल ४.६६ टक्क्यांनी घसरला आहे. निकालातील घसरणीमुळे महाविद्यालयांचे ‘कटऑफ’ही घसरणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गेली दोन वर्षे निकालाच्या आकडय़ांना फुगवटा आला होता. त्या तुलनेत या वर्षी निकालाची घसरण झाली आहे. गेली दोन वर्षे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण महाविद्यालयांनी खिरापतीसारखे वाटल्यामुळे निकालात चांगलीच वाढ झाली होती. निकालाच्या वाढत जाणाऱ्या या आकडेवारीला या वर्षी राज्यमंडळाने चाप लावला आहे. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बाहेरील परीक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले होते, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले. पर्यावरण शिक्षणासह सर्वच विषयांत महाविद्यालयांकडून वाटण्यात येणाऱ्या गुणांवर नियंत्रण आल्याचा परिणाम निकालावर झाल्याचे दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी या वर्षी परीक्षेच्या काळातही राज्य मंडळाने कडक धोरण अवलंबले. त्यामुळे अधिक प्रमाणात गैरप्रकार रोखण्यात यश आल्याचेही आकडेवारीवरून समोर येत आहे.
या वर्षी घसरलेल्या एकूण निकालाबरोबरच विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाणही घटले आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे प्रथम वर्षांचे ‘कटऑफ’ या वर्षी घसरण्याची शक्यता आहे.
या वर्षी ९४ हजार १२८ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी म्हणजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या साधारण ३ हजारांनी कमी झाली आहे. प्रथम श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ४ लाख ४५ हजार ११७ असून, गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या जवळपास ८ हजारांनी घटली आहे. विशेष म्हणजे या वर्षी खेळाडूंना उत्तीर्णतेसाठी विशेष गुण देण्याऐवजी सरसकट गुण देण्यात आले. मात्र निकालावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

पुढील परीक्षा आव्हानात्मक?
पुढील वर्षीपासून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे ‘नीट’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम आधारभूत मानला जातो. सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने पुढील वर्षीच्या परीक्षेत म्हणजे मार्च २०१७च्या परीक्षेत बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षांची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

निकालाची वैशिष्टय़े
* निकालात ४.६६ टक्क्यांनी घट. विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले.
* कोकण विभाग अव्वल, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी.
* ४५७ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल. शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ३६.
* एकूण १६२ विषयांपैकी १० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून, त्यात पर्यायी भाषा आणि व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे विषय आहेत.
* २ हजार ५३७ खेळाडूंना विशेष गुणांचा लाभ.

विभागवार निकाल
विभागाचे नाव आणि कंसात निकालाची टक्केवारी : कोकण (९३.२९), कोल्हापूर (८८.१०), औरंगाबाद (८७.८०), पुणे (८७.२६), नागपूर (८६.३५), लातूर (८६.२८), मुंबई (८६.०८), अमरावती (८५.८१), नाशिक (८३.९९).

प्रवेश सुकर..
या वर्षी अभियांत्रिकी प्रवेश सीईटीच्या गुणांच्या आधारे होणार आहेत. बारावीचे गुण हे केवळ पात्रतेपुरतेच गृहीत धरण्यात येणार आहेत. मात्र पारंपरिक विद्याशाखांसाठी प्रवेशाची चुरस कायमच राहण्याची शक्यता आहे. या वर्षी
निकालाची एकूण टक्केवारी घसरून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे महाविद्यालय बदलण्याची इच्छा असणाऱ्या किंवा बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सुकर होण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात बारावीचा निकाल
हे लक्षात ठेवा
* गुणपत्रकांचे वाटप- ३ जून दुपारी ३ वाजता
* गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत- २६ मे ते ४ जून
* छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत- २६ मे ते १४ जून
* पुनर्मूल्यांकन- पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांमध्ये पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करायचा आहे.
* जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जेईईचे प्रवेशपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

गैरप्रकारांमध्ये वाढ
या वर्षी निकाल कमी होण्याबरोबरच राज्यभर परीक्षेच्या दरम्यानचे गैरप्रकारही अधिक प्रमाणात उघडकीस आले आहेत. उत्तरपत्रिकांच्या काटेकोर तपासणीबरोबरच परीक्षेदरम्यानही राज्यमंडळाने अधिक सजगता दाखवली आहे. या वर्षी परीक्षेदरम्यान ७२९ गैरप्रकारांची नोंद करण्यात आली. सर्वाधिक म्हणजे २७२ गैरप्रकारांची नोंद औरंगाबाद विभागात झाली आहे. कोकण विभागात परीक्षेदरम्यान एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही.

पुनर्परीक्षा ९ जुलैपासून
दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षाही या वर्षीपासून ऑक्टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ९ जुलैपासून सुरू होणार असून, त्याचे सविस्तर वेळापत्रक येत्या आठवडय़ात जाहीर करण्यात येईल, असे राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले. अनुत्तीर्ण झालेले आणि श्रेणी सुधार करण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार आहेत. जुलैमधील परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना याच वर्षी पुढील अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे. बारावीची ऑक्टोबरमधील परीक्षा या वर्षीपासून होणार नाही.

राज्यमंडळाचा लोगो वापरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
राज्यमंडळाचा लोगो वापरून निकालाच्या तारखा, वेळापत्रके याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती मम्हाणे यांनी दिली. निकालाच्या तारखांबाबत परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच विविध संकेतस्थळे आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून अफवा पसरण्यास सुरुवात झाली होती.

Untitled-5

Untitled-6

Untitled-7